१५ कुटुंबांना वाळीत टाकणाऱ्या जात पंचायतविरोधात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पुणे

आंतरजातीय विवाह केल्याने तेलगू मडेलवार परीट जातीतून कोंढव्यातील १५ कुटुंबांना बहिष्कृत केल्याप्रकरणी १७ पंचांवर ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६’ या कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर राज्यात पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. उमेश चंद्रकांत रूद्रापे (वय ५१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांच्या तक्रारीनंतर ‘पुणे तेलगू मडेलवार समाज फंड’संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र नसूर म्हाकाळे, उपाध्यक्ष सुनिल दत्तू कोंडगिर, सचिव अनिल वरगंटे, सहसचिव श्रीधर बेलगुडे, सुरेश गुंडाळकर, खजिनदार सुनील वरगडे, सहखजिनदार देवीदास वरगडे, मुख्य संघटक शिवान्ना आरमुर, सह संघटक वसंत वरगडे आणि अन्य ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा परिसरात तेलगू मडेलवार परीट समाजाचे काही कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यातील तरूणांनी दुसऱ्या जातीतील तरूणींशी विवाह केला. त्यामुळे पंचांनी या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत केले आहे. वाळीत टाकलेल्या कुटुंबाला समाजातील इतरांचे लग्न, विविध समारंभ, गुणवंत विद्याथ्र्यांचे सत्कार अशा कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. टूंबांतील इतरांची लग्न होऊ नयेत यासाठी पंचांकडून हेतूत: त्रास दिला जात आहे. त्यामुळे पिडीत कुटूंबीयांनी संस्थेच्या पंचांना अनेकदा भेटून त्यांना न्याय देण्याची मागणी केली, परंतू, त्यांना जातीमध्ये सामावून घेतले नाही.

महाराष्ट्रामध्ये ३ जुलै २०१७ पासून ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६’ लागू झाला आहे. याचा आधार घेत या १५ कुटुंबीयांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी जात पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे.

राज्यातील पहिला गुन्हा
कोंढवा पोलीस ठाण्यात तेलगु मडेलवार परीट समाजाच्या पंचांवर ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६’ नुसार राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. या काद्यानुसार दोषींना तीन वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. दरम्यान, अंधश्रद्धेला प्रतिबंधक करण्यासाठी तयार केलेला ‘जादू टोणा विरोधी कायदा’ सर्वप्रथम पुण्यातच दाखल झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या