राष्ट्रवादीच्या स्विकृत नगरसेवकासह ७ जणांवर गुन्हा दाखल

51

सामना प्रतिनिधी । चाकण

खासगी सावकारकी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्विकृत नगरसेवकासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० टक्के व्याजाने दिलेले पैसे मुद्दलापेक्षा जास्त रक्कम देऊनही वसुलीचा तगादा लावून फिर्यादी पती-पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करून व्याजाच्या बदल्यात ऍक्टिव्हा दुचाकी नेल्याप्रकरणी चाकण नगरपरिषदेचा स्विकृत नगरसेवक राहुल कांडगे याच्यासह एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा १२ मार्च २०१५ ते १० मार्च २०१८ दरम्यान फिर्यादीच्या घरात घडला असून शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात मुंबई सावकार अधिनियम १९४६ चे कलम ३१, ३२, ४४, ४५ भादंवि कलम १४३, ४५२, ३२३, ३७९, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बंडू बाजीराव काळे ( वय ४५, रा. एकता सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, ए विंग, फ्लॅट नं. ४०१, चाकण, ता.खेड, जि.पुणे ) यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी राहुल किसन कांडगे, दिलीप कांडगे, पांडुरंग खुटाळ ( तिघेही रा. मार्केट यार्ड जवळ, चाकण ), भानुदास शेलार ( रा. चिंबळी, ता.खेड, जि.पुणे ), अरुण देशमुख ( रा. देशमुख आळी, चाकण ), प्रशांत तोत्रे व वैभव पानसरे ( दोघेही रा. स्वप्ननगरी, चाकण ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
प्रकरणातील आरोपी क्रमांक १ ते ५ यांचेकडून फिर्यादीने घेतलेले उसने पैसे १० टक्के व्याजदराने मुद्दल पेक्षा जास्त पैसे घेऊन फिर्यादी काळे यांच्याकडे जास्त पैशासाठी तगादा लावला. फिर्यादीच्या घरात घुसून काळे लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच पैशाची वसुली करणारे आरोपी तोतरे व पानसरे यांनी रात्री अपरात्री फिर्यादीच्या घरात घुसून पती-पत्नीस शिवीगाळ व दमदाटी केली. भानुदास शेलार याने फिर्यादीच्या मालकीची एक्टीव्हा दुचाकी क्रमांक ( एम एच १४ एफ वाय ७५६२ ) ही व्याजाच्या बदल्यात जबरदस्तीने टीटी फॉर्मवर सह्या घेऊन नेली. याबाबत ठाणे अंमलदार अरुण लांडे यांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मनोज यादव हे पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात अजूनही काही मोठ्या धेंड्यांची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या