नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक, दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

102
maharashtra-police2

सामना प्रतिनिधी । जालना

राज्य राखीव पोलीस बलामध्ये (क्र.3) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2 बेरोजगारांची 6 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन पोलिसांविरूध्द तालुका ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झालेले फेरोज नासिर पठाण व फेरोज इकबाल खान हे दोघेही जालना जिल्हा न्यायालयात कोर्ट पैरवी म्हणून कार्यरत आहेत.

जालना राज्य राखीव पोलीस बलामध्ये (क्र.3) जानेवारी 2016 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरु होती. त्यादरम्यान, मांजरगाव (ता.मांजरगांव) येथील लालखान कादरखान पठाण हे पोलीस शिपाई फेरोज नासिर पठाण यांना भेटले. त्यावेळी फेरोज पठाण याने तुमच्या मोठ्या मुलगा जावेद यास पोलीस शिपाई म्हणून राज्य राखीव पोलीस बलमध्ये नोकरीला लावून देतो, त्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. परीक्षेला बसण्यापूर्वी 3 लाख रुपये आणि नोकरीत रुजू झाल्यावर 3 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. लालखान पठाण यांनी 13 जानेवारी 2016 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्याकडून गृहकर्ज काढून 3 लाख रूपये फेरोज खान यास दिले. दरम्यान, मार्च- एप्रिल 2016 मध्ये राज्य राखीव पोलीस बल क्र. 3 च्या झालेल्या मैदानी चाचणी परीक्षेत लालखान पठाण यांचा मुलगा जावेद हा कमी गुण मिळाल्याने लेखी परीक्षेला अपात्र ठरला. त्यावेळी त्यांनी फेरोज पठाण याची भेट घेऊन याबाबत कल्पना दिली असता, तुम्ही काळजी करू नका, तुमचे शंभर टक्के काम होणार आहे. मैदानी चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्याने पुन्हा लालखान पठाण यांनी त्याची भेट घेऊन आपले काम झाले नाही, असे सांगितले. तेव्हाही पठाण याने तुम्ही काळजी करू नका, तुमचे काम होणार आहे, असे सांगून दिशाभूल केली.

त्यानंतर काही दिवसांनी फेरोज पठाण व फेरोज खान या दोघांनी लालखान पठाण यांना फोन करून तुमचे काम झाले आहे, त्याचे कॉल लेटर आणि पोलीस वर्दीची किट घेऊन जाण्यासाठी मुलगा जावेदला जालन्याला घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार, फेरोज पठाण व फेरोज खान या दोन्ही पोलिसांनी मोतीबागजवळ भेटून एक बोगस ऑर्डर आणि एक किट दिली. यावेळी उर्वरित राहिलेले 3 लाख रुपये त्यांनी घेतले. संध्याकाळी 5 वाजता मुलगा जावेद याला ट्रेनींगला पाठवायचे आहे, तुम्ही त्याला घेऊन राज्य राखीव पोलीस बल येथे गेट क्र. तीनवर या असे सांगितले. त्यानुसार पठाण पितापुत्र हे दोघे तेथे गेले असता रात्री उशिरापर्यंत हे दोघे पोलीस आलेच नाहीत. त्यानंतर खूप वेळा फोन केल्यावर फेरोज खान हा तिथे पोहोचला, त्याने या दोघा पिता-पुत्रांना तुम्ही फेरोज पठाण याचे अपहरण केले आहे, असा आरोप करून धमक्या दिल्या. त्यामुळे घाबरलेले हे दोघे पितापुत्र तसेच घरी परतले. त्यानंतर लालखान पठाण यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पैसे परत करण्यासाठी फेरोज पठाण यांच्याकडे तगादा लावला. फेरोज पठाण याने स्वतःच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्याचा 3 लाख 50 हजाराचा धनादेश दिला व एका कोऱ्या बॉन्डवर स्वाक्षऱ्या करून दिल्या. मात्र, पैसे दिलेच नाहीत. याप्रकरणी लालखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई फेरोज नासिर पठाण व पोलीस शिपाई फेरोज इकबाल खान या दोघांविरुद्ध 420, 465, 468, 471, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, सहायक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या