भोसरीतील एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी, एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल

102

सामना प्रतिनिधी । पुणे

माजी महसूलमंत्री भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून ४० कोटींपेक्षा जास्त किमतीचा भोसरी एमआयडीसीतील भूखंड केवळ पावणेचार कोटी रुपयांना खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांची पत्नी, जावई व इतर सहा जणांवर सोमवारी रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना जबरदस्त झटका बसला आहे.
एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी (५६), जावई गिरीश चौधरी (४३), अब्बास रसुलभाई उकाणी (७१) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे (३८, रा. निगडी प्राधिकरण) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

भोसरी येथील सर्व्हे क्रमांक ५२, हिस्सा क्रमांक २अ/२ या १ हेक्टर २१ आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी व हसनैन झोएब उकानी (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलाम सफैद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मस्लीम फकरुद्दीन उकानी, नफीसाय लियाकत काथावाल, मारिया मुस्तफा लकडावाला, साकिना नजीमुद्दीन उकानी, इन्सिया मुर्तुझा बादलावाला हे या जमिनीचे वाटेकरी आहेत. यातील उकानी यांचा भूखंड एमआयडीसीने ४० वर्षांपूर्वी संपादित केला आहे. हा भूखंड परत मिळावा यासाठी उकानी यांनी उच्च न्यायालयात ८ सप्टेंबर २०१५ रोजी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर खडसे कुटुंबीयांनी ही जमीन फक्त ३ कोटी ७५ लाख रुपयांना उकानी यांच्याकडून विकत घेतली. यासंदर्भात बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र विरोधकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते.

दरम्यान, हेमंत गवंडे यांनीही याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे आदेश ८ मार्च २०१७ रोजी न्यायालयाने दिले. त्यानुसार खडसे, त्यांचे जावई गिरीश चौधरी, पत्नी मंदाकिनी आणि मूळ जागा मालक उकाणी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस करत आहेत.

मूळ मालकाकडून जमीन खरेदी केली त्यात गैर काय?
राज्य सरकारच्या २००५च्या परिपत्रकानुसार एमआयडीसीने3वर्षांत जागा ताब्यात घेतली नाही तर ती पुन्हा मूळ मालकाच्या अखत्यारीत जाते. भोसरीची जमीन अशाच प्रकारे मूळ मालकाच्या अखत्यारीत होता, म्हणून ती मूळ मालकाकडून सनदशीर मार्गाने खरेदी करण्यात आली आहे. जावयाने त्यात गैर काय केले असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी याबाबत विचारला असून विरोधक या प्रकरणात मला आणि माझ्या कुटुंबीयांना खोटे गुंतवू पाहत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या