वाहतूक परवान्यासाठी लाच मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल

36
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नागपूर

वाहतूक परवान्यासाठी पाच हजार पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या साहाय्यक वनसंरक्षक व उपवनसंरक्षकावर बुधवारी (१४ फेब्रुवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. विनायक श्यामराव उमाळे (५७, साहाय्यक वनसंरक्षक कार्यालय, तेंदू कॅम्प) व रामभाऊ दामोदर प्रायकर (६५, वनविभाग, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

सावनेर तालुक्यातील सोनपूर येथील रहिवासी तक्रारकर्ते हे शेतातील झाडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी त्यांनी झाडे खरेदी करून वनविभागाच्या परवानगीने तोडली होती. तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी वनविभागाकडून परवाना मिळविण्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता. यासाठी ते तेंदू कॅम्पमधील साहाय्यक वनसंरक्षक कार्यालयातील उमाळे यांना भेटले. उमाळे यांनी तक्रारकर्त्यास नागपूर वनविभागातील उपवनसंरक्षक प्रायकर यांना भेटण्यास सांगितले. प्रायकर यांनी या कामासाठी तक्रारकर्त्यास पाच हजार ५०० रुपयांची मागणी केली. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने याची तक्रार नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. प्रायकर यांनी तक्रारकर्त्याकडून पैसे स्वीकारून परवाना दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना व प्रायकर यांना यासाठी मदत करणाऱ्या साहाय्यक वनसंरक्षक उमाळे यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींविरुद्ध सावनेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके, पोलीस हवालदार प्रवीण पडोळे, पोलीस शिपाई प्रभाकर बेले व मंगेश कळंबे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या