दिग्विजय सिंहांच्या रोड शोमध्ये ‘मोदी, मोदी’ घोषणा, भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

15
digvijay-singh

सामना ऑनलाईन । भोपाळ

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. रॅलीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅलीत दिग्विजय सिंह यांच्यासोबत कॉम्प्युटरबाबादेखील उपस्थित होते. मध्य प्रदेशातील भोपाळची जागा सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून दिग्विजय सिंह निवडणूक लढवत आहेत, तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे

दिग्विजय सिंह यांच्या रोड शोमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असल्याने येथे साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तैनात करण्यात आलेल्या सर्व पोलिसांनी भगवे पंचे परिधान केले होते. याबाबत त्यांना विचारले असता रोड शोदरम्यान त्यांना असे भगवे पंचे घालण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रोड शोचे नेतृत्व कॉम्प्युटरबाबांनी केले होते. यामध्ये अनेक साधूदेखील सहभागी झाले होते.

कॉम्प्युटरबाबा काँग्रेसचे स्टार प्रचारक
साध्वी प्रज्ञासिंह यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट साधू-संतांनाच निवडणूक प्रचारात उतरवले आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांना कॉम्प्युटरबाबांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. मंगळवारी भोपाळच्या एका मैदानावर या साधूंनी दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी हटयोग केला होता. कॉम्प्युटरबाबा यापूर्वी भाजपसोबत होते, मात्र काही कारणांनी नाराज झाल्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात धरला. भाजपप्रणीत केंद्र सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटरबाबांना काँग्रेसने आपला स्टार प्रचारक बनवले आहे. भोपाळमध्ये 12 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या