‘सामना’ प्रभाव, देवरुख येथील नांगरणी स्पर्धा आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल

639

देवरुख नजीकच्या पाटगाव येथे नांगरणीच्या नावाखाली घेतलेल्या स्पर्धा आयोजकांच्या चांगलीच अंगलट आली आहे. मुक्या प्राण्याना क्रूरपणे वागवल्या बद्दल देवरुख पोलिसांनी 7 जणांसह स्पर्धेत सहभागी बैल मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या कोकणात विशेषता संगमेश्वर तालुक्यात शेत नांगरणी स्पर्धांचे पेव फुटले आहे. 11 ऑगस्ट रोजी भाजपने अशीच एक स्पर्धा स्थानिक मंडळाच्या पुढाकाराने पाटगाव येथील मिलिंद दांडेकर यांच्या शेतात भरवली होती. या स्पर्धेत पाटगाव, पठारवाडी, देवरुख कुंभारवाडी, कनकाडी, निवे बुद्रूक, आरवली, मेघी येथून ५० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. दुपारी रंगलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते.

स्पर्धे दरम्यान एक बैल जोडी उधळली आणि ती बॅरिकेटस तोडून बाहेर पडली. या प्रकारामुळे स्पर्धास्थळी एकच कल्लोळ झाला. या बैलजोडिने दोघांना चिरडले मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. हा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि या विरोधी जोरदार चर्चा सुरु झाली.

यानुसार आज घटनेची चौकशी करून पोलिस नाईक किशोर जोशी यांनी याबाबतची फिर्याद देवरुख पोलिस ठाण्यात दाखल केली. यानुसार पोलिसांनी कलम 188, प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(1)(क), (2) तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी म. पो. का. कलम 37(1)(3) प्रमाणे पारित केलेल्या आदेशाचा भंग केल्या नुसार सुनील धाक्टु गोपाळ, बाळा पंदेरे, विजय नटे, दिलीप नटे, बाबु गोपाळ, प्रमोद अधटराव, राजा गवंडी या 7 जणांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडीचे मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत सर्वोच्च न्यायालयाचा प्राण्यांच्या झुंज व शर्यतीना बंदी असताना देखील स्पर्धकानी एक एक बैल जोडी पळवून बेकायदा स्पर्धा घेतली तसेच मालक व चालक यांनी आपल्या बैलाना मारहाण करून त्याना निर्दयतेची वागणूक दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबतीत अधिक तपास हे कॉ डी एस पवार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या