अतुल तापकीर आत्महत्या, प्रकरणी पत्नीवर गुन्हा

29

सामना ऑनलाईन । पुणे

‘ढोल ताशे’ चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह इतरांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नी प्रियंका अतुल तापकीर हिच्यासह सुसाईड नोटमध्ये नमूद केलेले तिचे भाऊ, मैत्रिणी यांच्यावर कलम ३०६, ३४ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट येथे अतुल तापकीर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट करून त्यामध्ये चित्रपट निर्मीतीमध्ये झालेला तोटा आणि पत्नी प्रियंकाने त्यांचा छळ केला. तिचे मानलेले भाऊ कल्याण गव्हाणे, बाळू गव्हाणे या दोघांनी त्यांना मारहाण केली, मावसभाऊ बाप्पू थिगळेने फोन करून धमक्या दिल्या. गणेशनगर येथे राहणाऱ्या मैत्रिणींवरही त्यांनी सुसाईड नोटमध्ये आरोप केले आहेत. डेक्कन पोलिसांनी अतुल यांचे वडील, इतर नातेवाईक, मित्रांचे जबाब घेतल्यानंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. यास परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी दुजोरा देत, ज्यांची नावे सुसाईड नोटमध्ये आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे त्यांनी सांगितले.

पैसे घेणाऱ्या पोलिसांची चौकशी
प्रियंकाने अतुल व त्यांच्या वडिलांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांना अटक न करण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपये घेतल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्यामुळे सांगवी पोलीस ठाण्यातील संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. त्याचा अहवाल आठ दिवसांत मागितला आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या