तामिळनाडूतील कांचीपुरमच्या फटाका कारखान्याला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू, 19 गंभीर जखमी

तामिळनाडूतील कांचीपुरम येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 19 जण गंभीर जखमी झाले, तर 8 जणांचा मृत्यू झाला. आगीत गंभीर जखमी झालेल्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर लोकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना आग लागल्याच्या घटनेबाबत माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यासोबतच बचावकार्यही केले. अग्निशमन दलाला तासाभराच्या अथक परिश्रमानंतर फटाक्यांच्या कारखान्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी फटाक्यांच्या कारखान्यातून 27 जणांची सुटका केली. आगीत गंभीर जखमी झालेल्या वाचवून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दाखल झालेल्यांपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना कांचीपुरम येथील सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर इतर रुग्णालयात पाठवले आहे तसेच सर्व जखमींना उपचाराकरिता वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झालेल्यांपैकी 8 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.

फटाक्यांच्या कारखान्याला आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कांचीपुरम पोलीस आग लागल्याचे कारण शोधत आहेत.