उरण येथे गोदामाला आग

19

सामना प्रतिनिधी। उरण

जासई गावाजवळील अश्विनी लॉजिस्टिक सोल्यूशन या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. एक तासाच्या अथक प्रयत्नांनतर ही आग विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा जासई भागातील अनधिकृत गॅरेज आणि गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जासई पोलिस चौकीच्या मागे असलेल्या या गोदामात मालाची साठवणूक आणि गाड्यांची दुरूस्ती केली जाते. सोमवारी दुपारच्या सुमारास गोदामातील गवताने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग पसरली व जवळच पडलेले टायरही पेटले. यामुळे आग अधिकच भडकली. यात तीन कंटेनर ट्रेलर जळून खाक झाले आहेत. गोदामात टायर आणि सुके गवत असल्यामुळे ही आग वेगात पसरत होती. आग लागल्याचे कळताच जेएनपीटी आणि सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एका तासानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या आगीमुळे परत एकदा जासई भागातील अनधिकृत गॅरेज आणि गोदामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोच्या जागेत अतिक्रमण करून शेकडो गॅरेज, कंटेनर यार्ड, व गोदामे येथे उभारण्यात आली आहेत. या अनधिकृत गोदामांमुळे नागरिकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला असून या गोदामात सुरक्षेची, आग प्रतिबंधात्मक साधने नसल्यामुळे अशा आगीच्या घटना घडत आहेत. तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका टायरच्या गोदामाला आग लागली होती आणि ती आग विझवताना अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागली होती. दरम्यान या घटनेनंतर तरी सिडको व महसूल विभाग या अनधिकृत गॅरेज, कंटेनर यार्ड व गोदामांवर कारवाई करणार का असा प्रश्न जासई ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या