मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग, 23 जणांचा होरपळून मृत्यू तर 11 जण जखमी

मेक्सिकोच्या हर्मोसिलो शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून 23 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तर 11 जणं जखमी झाली आहेत. सर्वांना शहरातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरु असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. या घटनेने मेक्सिकोमध्ये खळबळ उडाली आहे.

सोनारा राज्याचे अटॉर्नी जनरल गुस्तावो सालास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीनंतर दुकानात धूर झाला. विषारी गॅस वेगाने पसरल्याने बहुतेक लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीमने मृतदेहांची तपासणी सुरू केली आहे. तर हा हल्ला किंवा हिंसक घटना नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं की स्फोट झाला आहे की नाही याची चौकशी सुरू आहे.