गोंदियात हॉटेलला आग, सहा जणांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । गोंदिया

गोंदिया येथील बिंदल थाट या हॉटेलमध्ये बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत सहाजणांचा मृत्यू झाला असून सातजणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सात तास प्रयत्नांची शर्थ केली.

गोंदियातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात बिंदल थाट हॉटेल आहे. बुधवारी चारच्या सुमारास या हॉटेलला आग लागली. हॉटेलमधील गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे या आगीने भीषण स्वरूप धारण केले. आजूबाजूच्या लोकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तात्काल तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. त्यामुळे हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेकजण अडकून पडले होते. चार-पाच जणांना आगीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र सहाजणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. तर हॉटेलमध्ये आग लागलेली पाहून एका व्यक्तीने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली, यात तो गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला नागपूरला हलवण्यात आले होते. मात्र रस्त्याच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हॉटेलमधील सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीची भीषणता वाढल्याचे सांगण्यात आले. सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.