देवळ्यात १४ एकरावरील फळबाग आगीत भस्मसात

सामना प्रतिनिधी । नाशिक/देवळा

शेतातून गेलेल्या अतिउच्चदाबाच्या विद्युततारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे चौदा एकरावरील डाळिंब आणि आवळ्याची बाग भस्मसात झाली. यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या डाळिंब उत्पादक शेतकरी रमेश सावंत यांचे पन्नास लाखांचे नुकसान झाले असून, या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

डोंगरगावातील रमेश दामू सावंत यांनी चार वर्षांपूर्वी १४ एकरवर पाच हजार डाळिंबाची व अकराशे आवळ्याच्या झाडांची बाग मोठ्या कष्टाने उभी केली. यावर्षी त्यांनी औषध फवारणी, ठिबक, मशागत यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च केला. संपूर्ण कुटुंबाने रात्रंदिवस बाग वाचविण्यासाठी कष्ट केले. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतातून गेलेल्या अतिउच्चदाबाच्या विद्युततारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने बागेवर ठिणग्या पडल्या आणि ही बाग आगीच्या विळख्यात सापडली. तेथून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तातडीने सावंत यांना ही माहिती कळविली. दहा-पंधरा मिनिटात ते शेताजवळ हजर झाले, मात्र आगीचा रुद्रावतार बघता ती विझविणे केवळ अशक्य होते. अवघ्या अर्ध्या तासातच सावंत कुटुंबाच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेले हे उभे पीक भस्मसात झाले. तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी आज नुकसानीचा पंचनामा केला आहे. मात्र, नुकसानीची भरपाई केव्हा व किती मिळेल हे सांगता येत नसल्याचे संबंधितांनी सांगितले.

दोन वर्षे जमीन नापीक राहणार

आगीमुळे दोन्ही बागांचे नुकसान तर झालेच; परंतु जमिनीच्या खोलवर आगीची झळ बसल्याने जमिनीचा पोतही घसरला आहे, यामुळे पुढील दोन वर्षे तरी येथे कुठलेही पीक घेणे शक्य होणार नाही, असे शेतकरी सावंत यांनी सांगितले.

दोन दिवसात विक्री होणार होती

या बागेतील एकूण २५ टन डाळिंब तयार झालेले होते, त्याची काढणी करून दोन दिवसातच ते नाशिकला विक्रीसाठी नेण्यात येणार होते, मात्र त्याआधीच संपूर्ण पीक नष्ट झाले आहे.

पंधरा लाखांचे कर्ज

डाळिंब व आवळ्याची बाग जगविण्यासाठी पैसे नसल्याने रमेश सावंत यांनी महाराष्ट्र बँकेकडून पंधरा लाखांचे कर्ज घेतले होते, ते या उत्पन्नातूनच फेडणार होते. परंतु आता सर्वच उद्ध्वस्त झाल्याने कर्ज फेडायचे कसे, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या