नांदेड – आगीमध्ये कपिलो पेट्रोकेम कारखाना जळून खाक

50

सामना प्रतिनिधी । नांदेड

सिडको लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील कपिलो पेट्रोकेम कारखान्यात अचानक लागलेल्या आगीमुळे प्रचंड काळोख्याचे धुर पसरले, पाहता पाहता या कारखान्याकडे अनेकांनी धाव घेतली मात्र आगीने रौद्रारुप धारण केल्याने कारखाना जळून खाक झाला. घटनास्थळी औद्योगिक वसाहत, मनपा व विमानतळ प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग अटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घेण्यात आले. अखेर तब्बत तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. कारखान्याशेजारी असलेल्या शैलेश कऱ्हाळे यांच्या पाणी शुध्दीकरण कारखान्यातून घेण्यात आलेल्या पाण्यामुळे आग आटोक्यात आली.

दशरथ मरसोने व सुनिल भंडारी यांचा कपिलो पेट्रोकेम हा ऑईल शुध्दीकरणाचा कारखाना आहे. शनिवार दुपारी ३ च्या सुमारास या कारखान्यात आग लागली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने कारखाना परिसरातील व इतर कारखान्यातील अनेक मजूर, कारखानदार या आगीच्या रौद्ररुपामुळे बाहेर पडले. बघता बघता कारखाना परिसरातील अनेक छोटे मोठे बॉईलर व मोठ्या प्रमाणात असलेल्या ऑईलच्या टाक्या आगीच्या विळख्यात येऊन भस्मसात झाल्या. अखेर औद्योगिक वसाहतीच्या-०१, मनपाची-०१ व विमानतळ प्राधिकरण-०१ अग्निशामक दल व दोन टँकर तसेच अ‍ॅक्वा केअर या पाणी जलशुध्दीकरण कारखान्यातून सुमारे २ ते ३ लाख लिटर हौदातील पाण्याच्या सहाय्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.

आग लागताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतील विद्युत पुरवठा बंद केला. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीच्या धुराचे लोळ आकाशात झेपत होते. या आगीत मात्र कपिलो पेट्रोकेमचे पूर्णत: मशनरी, साहित्य जळून खाक झाले असले तरी जिवीतहानी मात्र टळली.

आपली प्रतिक्रिया द्या