अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी ओल्या पार्टी, जुगारात तर्र

33

सामना प्रतिनिधी । परभणी

नुकतेच मनपात रुजू झालेले उपायुक्त भरत राठोड यांनी शहरातील अग्निशमन विभागाला अचानक भेट दिली असता त्यांना तेथील सर्व कर्मचारी व अधिकारी दारूची पार्टी व जुगार खेळत असल्याचे आढळून आले. हा गंभीर प्रकार पाहून उपायुक्त भरत राठोड अवाक झाले. सर्वच कर्मचारी दारु आणि जुगार खेळत आपल्या मित्रांसमवेत आनंद लुटत असतांनाच ते रंगेहात पकडले गेले. आता या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे उपायुक्त भरत राठोड यांनी सांगितले. तसेच कारवाई सुद्धा वरिष्ठांकडे प्रस्तावित केली असल्याचेही ते म्हणाले.

परभणी मनपामध्ये काही दिवसांपूर्वीच उपायुक्त भरत राठोड हे सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी १८ रोजी रात्री ९ वाजता अचानक अग्निशमन विभागास भेट दिली असता या ठिकाणी मद्यपानाबरोबरच जुगार चालू असल्याचे त्यांच्या निरदर्शनास आले. यात या विभागाचा अधिकारी व सर्व कर्मचारी दारूच्या नशेत ‘टूल’ होऊन धिंगाणा घालत होते. या सर्वांना रंगेहात पकडून मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये उपायुक्त राठोड यांनी कैद केले.

मागील अनेक महिन्या पासून या विभागात जुगार व दारुअड्डा चालविण्यात येत असताना सुध्दा याबाबत मनपातील काही वरिष्ठ अधिकारी यांना याची माहिती असताना देखील या वर कोणीही कार्यवाही केली नव्हती. कारण यामध्ये मनपातील सत्ताधारी पक्षातील काही मोठ्या नेत्याचा या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हात असल्याचे बोलले जात आहे. तर येथील अग्निशमन अधिकारी हा आयुक्त यांचा नातेवाईक असल्यामुळे यावर कोणीही कार्यवाही केली नाही. या घटने मध्ये या विभागाचे सर्व कर्मचारी रोजनदारी तत्वावर घेतलेले असून अधिकारी सुद्धा रोंजंदारी तत्वावरच आहेत. या घटनेत अग्निशमन अधिकारी याने घटनास्थळावरून पळ काढला होता. तसेच पार्टी करणारे त्यांचे मित्र सुद्धा उपायुक्त राठोड येताच पसार झाले होते. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद असून अग्निशमन अधिकारी आणि अन्य एक कर्मचारी अशा दोघांविरुद्ध कारवाई प्रस्ताविक केली असल्याचे उपायुक्त राठोड यांनी सांगीतले.

आपली प्रतिक्रिया द्या