जवानांसाठी अग्निरोधक तंबू

24

 

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उरी येथील लष्कराच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जवानांना अत्याधुनिक सेवासुविधा देण्यावर संरक्षण मंत्रालयाने भर दिला आहे. यातंर्गत जवानांना अत्याधुनिक हेल्मेट दिल्यानंतर आता अग्निरोधक तंबू दिले जाणार आहेत. कानपूर मधील एका फॅक्टरीत या तंबूंची निर्मिती करण्यात येत आहे.

अग्निरोधक तंबू तयार होताच लष्कर त्याची प्राथमिक चाचणी घेणार आहे. यावेळी लष्कराला जर या तंबूंमध्ये काही त्रुटी आढळल्या तर  त्यात बदल केले जाणार आहेत. लष्कराने शिक्कामोर्तब केल्यानंतरच हे तंबू जवानांकडे सूपूर्द केले जाणार आहेत.

उरी येथील लष्कराच्या तळावर सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवान रात्री तंबूत आराम करत असताना दहशतवाद्यांनी तंबूवर ग्रेनेड हल्ला केला होता. यावेळी तंबूला लागलेल्या आगीत अनेक जवान जखमी झाले होते. तर तंबूबाहेर धाव घेणा-या जवानांवर अंधारात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. यात १७ जवान शहीद झाले होते.

या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने जवानांना मिळणा-या सुविधांवर प्रश्नचिन्ह उभारले जात होते. त्यापार्श्वभूमीवर  संरक्षण मंत्रालयाकडून जवानांना अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या