मुंबई गोवा महामार्गावर आगवे येथे आरामबस जळून खाक

15

सामना प्रतिनिधी । आरवली

सावर्डे – मुंबई – गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस (एमएच.०३ -सीपी-१४७२ ) चिपळूण तालुक्यातील आगवे गावच्या हद्दीत अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. बसच्या इंजिन भागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र बसमधील प्रवाशांचे सामान आगीत भस्मसात झाले. ही दुर्घटना शनिवारी (दि. 8) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

आगवे येथील प्राचार्य मंगेश भोसले यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडली. इंजिनला आग लागताच चालकांने बस महामार्गाच्याकडेला उभा केली. इंजिनमधील ऑईल कोटा कमी झाल्याने आग लागली असे चालक घटनेनंतर सांगत होता. पण आगीचे रौद्ररुप पाहून चालक व क्लिनरने घाबरुन पलायन केले.

आगीने रौद्ररुप धारण करताच बसचालकाने क्लिनरच्या मदतीने प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितले. पण झोपेतील प्रवाशी गोंधळल्यामुळे जिवाच्या आकांताने धावपळ करू लागले. धावपळीत प्रवाशांचा बॅगा गाडीतच राहिल्यामुळे काहींचे दागिने, पैसे, मोबाईल कागदपत्रे जळून गेले. स्थानिक चिरंजीव भंडारी, अनिकेत भंडारी, सुमित भंडारी, सुदर्शन भंडारी, पंकज साळवी, रुपेश भंडारी, राकेश भंडारी, अमीर गावणंग, मुन्ना साळवी या तरुणांनी घटनास्थळी धाव घेवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

नायजेरियन महिलेचा पासपोर्ट जळून खाक
बसमधून सुमारे २० प्रवासी होते. त्यामध्ये तीन महिलांचा समावेश होता. त्यापैकी एक नायजेरियन महिला होती. तिचा पासपोर्ट जळून खाक झाला. घटनेची माहिती समजताच सावर्डे पोलिसांनी धाव घेतली. अग्निशामक बंब बोलावण्यात आले. चिपळूणहून बंब येण्यास एक तास लागला. तोपर्यंत आगीने बसला चारही बाजूने वेढले होते. त्यामुळे महामार्गावरील एक तास वाहतूक रोखण्यात आली.

सावर्डे पोलिसांची मदत
बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा जळाल्यामुळे पैसेच नसल्याने पोलिसांनी प्रवाशांना तिकिटासाठी पैसे दिले.

आपली प्रतिक्रिया द्या