पाटण तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबार; लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या

पाटण तालुक्यात आता किरकोळ कारणांवरून थेट बंदुकीतून गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तळमावले येथे लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. हवेत गोळीबार करणाऱयाला ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून परवानाधारक 12 बोअरची रायफल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त गोळीबार होऊ लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जितेंद्र जगन्नाथ कोळेकर (वय 51, रा. तळमावले) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पाटण तालुक्यातील तळमावले येथे काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर एका लग्नाची मिरवणूक सुरू होती. लग्नाच्या मिरवणुकीवेळी एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच, पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी गोळ्या झाडणाऱया जितेंद्र कोळेकर याला ताब्यात घेतले. तळमावले येथील जितेंद्र कोळेकर याच्याकडे स्वसंरक्षणाची परवानाधारक 12 बोअरची रायफल आहे. त्याने लग्नाच्या मिरवणुकीवेळी त्या रायफलचा गैरवापर करून हवेत 3 फैरी झाडल्या.

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बंदुकीतून हवेत गोळीबार करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच, दहशतीचे वातावरण निर्माण करून इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल, अशी कृती केली. याशिवाय जिल्हाधिकाऱयांच्या शस्त्र्ाबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

सातारा जिह्यात आठवडय़ात तिसऱयांदा फायरिंग

पाटण तालुक्यात रविवारी 19 मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे यांचा माणूस, माजी नगरसेवक मदन कदम याने केलेल्या गोळीबारात 2 ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी 22 मार्च रोजी सातारा तालुक्यात एका मॉलमध्ये बंदुकीतून गोळी सुटून सेल्समन जखमी झाला होता, तर शुक्रवारी थेट लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. यामुळे सातारा जिह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे.