खंडणीसाठी मोबाईल व्यावसायिकावर गोळीबार करणार्‍या सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक

624

पन्नास हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून मोबाईल विक्रेत्यावर गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याच्यासह आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. सचिन जुमनाळकरसह तीन आरोपींना पोलिसांनी विजापूर येथून अटक केली. त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, मोबाईल हॅण्डसेट आणि चॉपर जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

21 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बंदररोड येथील रामलक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या येथे नॅशनल मोबाईल कॉपीचे मालक मनोहर सखाराम ढेकणे हे आपल्या घरी जात असताना एक चारचाकी गाडी त्यांच्याजवळ आली. त्यामधून पॅरोलवर सुटून फरार झालेला सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर साथिदारांसोबत आला व चाकूचा धाक दाखवून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने खिशातून रिव्हॉल्व्हर काढून ढेकणे यांच्यावर गोळी झाडली आणि ते दोघे फरार झाले. जखमी ढेकणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सचिनसह अन्य आरोपीचा शोध सुरु केला.

पॅरोलवर सुटून फरार
2007 साली केलेल्या खूनाच्या गुन्ह्यात सचिन कोल्हापूर येथे कळंबा कारागृहात जन्मठेपेची सजा भोगत आहे. त्याने संचित रजेसाठी विनंती केली होती. परंतू मंद्रूप पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी सचिनला संचित रजा मंजूर करु नये असा अहवाल दिला होता. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात संचित रजेसाठी रिटपिटीन दाखल केले. त्यानंतर त्याला 28 दिवसांची संचित रजा मंजूर झाली होती. 28 दिवसांच्या रजेवर कारागृहातून बाहेर आलेल्या जुमनाळकरला पुन्हा 26 नोव्हेंबर 2019 रोजी कारागृहात हजर होणे आवश्यक होते. मात्र तो कारागृहात हजर न होता फरार झाला. त्याबाबत मंद्रूप पोलीस ठाण्याने गुन्हाही दाखल केलेला आहे.

विजापूर येथे जुमनाळकंरला पकडण्यात यश
रत्नागिरी गुन्हे स्थानिकं अन्वेषण शाखेचे एक पथक कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रवाना झाले. विजापूर नजिक होरती गावामध्ये सचिन असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्याठिकाणी पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यान एका मोटारसायकलवरुन तीन इसम येताना दिसले. पोलिसांनी सचिनला ओळखले. काही अंतर पाठलाग केल्यानंतर त्याला पकडण्यात पोलीसांना यश आले. सचिन जुमनाळकर (वय-42, रा. बेलबाग), त्याचा मेहूणा सिध्दराम कांबळे (वय- 28 रा. तेलगाव, दक्षिण सोलापूर), आणि पुतण्या मनोहर चलवादी, (रा ज़ुमनाळ, विजापूर) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या