पुण्यात ‘राँग साइड एन्ट्री’ वाढल्या; 300 जणांवर एफआयआर दाखल

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यात रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 300 वाहनचालकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात अशीच कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देखमुख यांनी सांगितले. कायद्यानुसार एक हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

पुण्यातील अपघात व दुर्घटनांची संख्या कमी करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या निर्देशानुसार पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात मे महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात हेल्मेट न घालता वाहने चालवणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. नो एन्ट्रीतून आणि विरुद्ध दिशेने वाहने चालवण्यामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक अपघात हे मानवी चूकांमुळे आणि नियम मोडण्यामुळे होत आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळित करण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. शहरातील या कारवाईला वेग देणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना पत्रके आणि गिफ्ट व्हाऊचर वाटण्यात येत आहेत. ‘आभार’ उपक्रमातंर्गत पोलिसांनी ही पत्रके वाटली आहेत. मॉल ,रेस्टॉरंट आणि मोक्याच्या ठिकाणी ही पत्रके वाटण्यात येत आहेत. जनतेत वाहतूक नियमांबाबत जनजागृती करून अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे ध्येय असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच ‘आभार’ उपक्रमातंर्गत वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना गिफ्ट व्हाऊचरही देण्यात येणार आहेत. मात्र, वाहतूक नियम पाळणे त्यासाठी गरजेचे आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांनी नियम मोडले नसल्याची खात्री पटल्यानंतरच हे व्हाऊचर देण्यात येणार आहेत.