देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना, कातवणच्या तरुणांनी पाठवली पहिली भेट

देवगड तालुक्यातील कातवण येथील दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सिताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसचे पीक चांगल्या पद्धतीने घेऊन देवदिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ केला. त्यांनी पहिली दोन डझनची पेटी नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यातच मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर आज पाठवली आहे. सकाळी आठ वाजता आंबे काढून या पेटीच्या शुभारंभ करण्यात आला.

कातवण येथील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे आणि दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना 15 ऑगस्टपासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती, मात्र काही कलमावरील आलेला मोहर गळून पडला. त्यानंतर चार ते पाच कलमावरील मोहरा तसाच टिकून राहिला आणि तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवर मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी काढून शुभ मुहूर्त केला. त्यानंतर त्या पेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली. आंबा बागायतदार शिंदे हेही आंबापेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले.

या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजारच्या आसपास भाव मिळेल, असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यावर्षी आंबा सिझन पाहता अजून हापूसच्या कलमांना पालवी फुटत आहे. त्यामुळे हापूस कलमांची योग्य निगा राखून ही पहिली पेटी या दोन तरुण आंबा बागायतदारांनी पाठविली आहे. ऋतुचक्रात वारंवार होत असलेले बदलांमुळे दोघा भावांनी आंबा मोहोर टिकवण्यासाठी मेहनत घेतली. आंब्याची चव स्वत: चाखून पाहिली. त्यानंतर उर्वरित आंबे पेटीत भरून पेटी वाशी मार्केटला पाठवण्याची सोय केली.

ऋतुचक्रात बदलांना सामोरे जावे लागत असूनही स्वत: पिकवलेल्या आंब्याचा दर्जा चांगला राखणे, चव चाखून मालाच्या दर्जाची खात्री करणे, हा भाग शेतकऱ्यांनी पाहणे खूप गरजेचे असते, असे मत यावेळी तरुण आंबाबागायतदार दिनेश आणि प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.