कोकण रेल्वेमार्गावरून धावली पहिली कंटेनर रेल्वेगाडी; उद्योजकांसाठी निर्यात सोयीची ठरणार, रत्नागिरी ते जेएनपीटीदरम्यान वाहतूक

कोकण रेल्वे मार्गावरून आज पहिली कंटेनर रेल्वेगाडी धावली. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कंटेनर रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. रत्नागिरी ते जेएनपीटीदरम्यान हि कंटेनर रेल्वेगाडी धावणार असून उद्योजकांना आपले उत्पादन निर्यात करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

आज सायंकाळी 5:15 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकातून पहिली कंटेनर रेल्वेगाडी धावली.यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता,संचालक संतोषकुमार झा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एल.के.वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे, गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक दीपक गद्रे, संचालिका मीना गद्रे उपस्थित होते. रत्नागिरी ते जेएनपीटी दरम्यान ही कंटेनर ट्रेन धावणार आहे. आज पहिल्या दिवशी 12 कंटेनरमधून 250 मेट्रिक टन माल घेऊन ही गाडी धावली. कृषी उत्पादने, मत्स्य उत्पादन आणि आंबा उत्पादकांसाठी निर्यातीकरिता माल पाठवणे सोयीचे होणार आहे. आज पहिल्या कंटेनर गाडीतून गद्रे मरीनच्या उत्पादनाची वाहतूक करण्यात आली.

गद्रे मरीनचे संचालक दीपक गद्रे म्हणाले की, 1994 साली रस्ते मार्गाने कंटेनर वाहतुकीसाठी मी प्रयत्न केले होते. रस्ते चांगले नाहीत या कारणाने रत्नागिरीत कंटेनर वाहतूक होत नव्हती. तेव्हा मी लिहून दिले की, रस्त्यामुळे कंटेनरचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी मी घेईन. त्यानंतर 44 कंटेनर रत्नागिरीत आले होते. आज पुन्हा एकदा रेल्वेमार्गाने कंटेनर वाहतूक होणार असल्याने आम्हा उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. माझे आणि कोकण रेल्वेचे नाते जुने आहे. 1991 ला कोकण रेल्वेचे काम सुरू झाले तेव्हा माझ्या पेट्रोलपंपातून डिझेल पुरवठा केला जात होता, अशी आठवण गद्रे यांनी सांगितली.

वर्षभरात कोल्ड स्टोअरेज उभारणार
कोकण रेल्वेचे संचालक संतोषकुमार झा म्हणाले की, आमचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कंटेनर वाहतूक रस्त्याने होते. आपल्या रेल्वेमार्गाने कंटेनर वाहतूक का होत नाही. आपण प्रयत्न करायला हवेत आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न सुरू केल्यावर आज कोकण रेल्वेमार्गावरून कंटेनर रेल्वेगाडी सुरू होत आहे. या गाडीत वातानुकूलित आणि साध्या कंटेनरचाही समावेश असेल. वातानुकुलित कंटेनरमध्ये ऋण 18 अंश सेल्सियस तापमान ठेवले जाणार आहे. वर्षभरात आपण रत्नागिरीत कोल्ड स्टोअरेजही उभारणार आहोत.

कंटेनर गाडीमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात भर
आंबा, मासे, प्रक्रिया उद्योगसह कृषीवर आधारित उद्योगांसाठी कंटेनर रेल्वेगाडी फायदेशीर ठरणार आहे. आज पहिल्या दिवशी 12 कंटेनर घेऊन गाडी धावली. पुढची गाडी केव्हा असेल हे आता सांगता येणार नाही, मात्र आमच्याकडे सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील उद्योजकांनी कंटेनर वाहतुकीसाठी चौकशी केली आहे. त्या भागातून आम्हाला प्रतिसाद मिळेल. कंटेनर गाडीमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नातही थोडीफार भर पडेल.

– संजय गु्प्ता, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे