महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी गुरुकुल, १ मे रोजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

61

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या वास्तूचे उद्घाटन सोमवार दि १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मराठी माध्यमाच्या गुरुकुलबरोबरच इंग्रजी माध्यमाचे महाराष्ट्रातील पहिले गुरुकुल अशी त्याची ओळख असेल असेही पटवर्धन यांनी यावेळी जाहीर केले.

शिल्पा पटवर्धन पुढे म्हणाल्या की कै.बाबूराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष उभा केला. त्यांचे कुठेही नाव नाही. त्यामुळेच आम्ही या गुरुकुल प्रकल्पाला बाबूराव जोशी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. या गुरुकुल प्रकल्पामध्ये अभ्यासाबरोबरच अनेक उपक्रम राबवले जातात. संतुलित आहाराबरोबरच पदभ्रमंती, योगासने, वृक्षारोपणसारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. १ मे रोजी होणाऱ या बाबूराव जोशी गुरुकुलाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर तेजोमय… तेजोनिधी हा नृत्याचा कार्यक्रम खातू नाटय़मंदिरमध्ये सादर होणार असल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या