देवगाव रंगारीत होणार मराठवाड्यातील पहिले गारमेंट क्लस्टर

106

देविदास त्रिंबके । संभाजीनगर

केंद्र, राज्य सरकार व स्थानिक उद्योजकांच्या सहभागातून मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात देवगाव रंगारी येथे पहिले गारमेंट क्लस्टर उभारण्यात येत आहे. या क्लस्टरमुळे मराठवाड्यातील गारमेंट क्षेत्रातील व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार असून, या क्लस्टरमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाणार असल्याने गारमेंट व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.

देशभरात उद्योग व्यावसायिकांना मदत ठरणारे अनेक क्लस्टर सेंटर उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सुरुवातीला पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पहिले क्लस्टर उभारण्यात आले होते. त्यानंतर नाशिकमध्ये क्लस्टरची स्थापना झाली होती, अशा प्रकारचे क्लस्टर सेंटर मराठवाड्यातही व्हावे, यासाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेतल्याने मराठवाडा ऑटो क्लस्टर प्रकल्प उभा राहिला आहे. त्याच धर्तीवर छोट्या उद्योजकांसाठी पूरक ठरणारे क्लस्टर उभारण्यासाठी देवगाव रंगारी येथील काही तरुण नवउद्योजकांनी अभ्यास करून कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात गारमेंट क्लस्टर उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी अभ्यास करून गारमेंट क्षेत्रात असलेला अभाव, मागासलेलापण या क्लस्टरच्या माध्यमातून दूर करण्यासाठी या क्लस्टरची उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

संभाजीनगर शहरापासून जवळपास ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगाव रंगारी येथे १ एकर जागेमध्ये गोविंद गारमेंट असोसिएशन नावाने हे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वेंâद्र व राज्य सरकारकडून ७० टक्के सहभाग तर असोसिएशनचा ३० टक्क्यांचा सहभाग राहणार आहे. या क्लस्टरला राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या क्लस्टरचा मोठा फायदा हा गारमेंट व्यवसायातील छोट्या उद्योजकांना होणार आहे.

फॅशन डिझायनरला मिळणार वाव
गारमेंट क्षेत्रात दररोज नवनवीन फॅशन डिझाईन बाजारात येत आहेत. बाजारात येणाऱ्या फॅशन किंवा स्वत: तयार केलेल्या नवीन फॅशननुसार ड्रेस किंवा कपडे तयार करण्यासाठी या क्लस्टरचा मोठा फायदा होणार आहे. फॅशन डिझायनरने तयार केलेल्या पॅâशन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या क्लस्टरचा उपयोग होणार आहे.

टेलिंरग व्यवसायाला चांगले दिवस
टेलिंरग व्यवसाय हा काही वर्षांपासून तोट्यात जात आहे. बाजारात मिळणाऱ्या रेडीमेंट गारमेंटमुळे टेलिंरग व्यवसाय हा डबघाईला आला आहे. कार्पोरेट क्षेत्रात बहुतेक ठिकाणी आज ड्रेसकोड ठेवण्यात येत आहे. त्यासाठी अशा कार्पोरेट कंपन्यांना ड्रेस पुरविण्यासाठी टेलिंरग व्यावसायिकांना कंत्राट मिळाल्यानंतर या क्लस्टरमधून ते पूर्ण करण्यास मोठी मदत होऊ शकते.

क्लस्टरची वैशिष्ट्ये

– क्वॉलिटी कंट्रोल युनिट
गारमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांना तसेच ग्राहकांना योग्य दर्जाचे उत्पादन कसे देता येईल, त्यासाठी क्वॉलिटी कंट्रोल युनिट उभारण्यात येणार आहे. ग्राहकांच्या मागणी व बजेटनुसार त्या क्वॉलिटीचे गारमेंट कसे पुरविता येईल, याचा ताळमेळ या ठिकाणी लावण्यात येणार आहे. क्वॉलिटीची तपासणी करणाऱ्या मशिनरी या कल्सटरमध्ये उपलब्ध होणार आहे.

– पॅकेजिंग सेंटर
कोणत्याही व्यवसायात मार्केटिंगला महत्त्व असते. उत्पादित मालाला योग्य भाव मिळविण्यासाठी त्या मालाचे पॅकेजिंग कशी करतो, यालादेखील बाजारात महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे आपल्या तयार केलेल्या गारमेंटला योग्य भाव मिळविण्यासाठी पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी मार्गदर्शन तसेच पॅकेजिंग सेंटरचा या क्लस्टरमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

– ट्रेनिंग सेंटर
गारमेंट क्षेत्रात नवनवीन कल्पना व आविष्काराची तात्काळ माहिती फॅशन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना मिळावी, त्यासाठी या क्लस्टरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार आहेत. या ट्रेनिंग सेंटरद्वारे फॅशन जगताची माहिती सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे या सेंटरचा मोठा फायदा जिल्ह्यातील नवउद्योजकांना होणार आहे.

– गारमेंट क्लस्टरचा असा होणार फायदा
संभाजीनगर जिल्हा हा मराठवाड्याच्या राजधानीबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या जिल्हा मानला जातो. जिल्ह्यातील उद्योग व्यवसायामुळे या जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मराठवाड्यातील कापूस उत्पादन जास्तीचे असले, तरी त्यापासून तयार होणाऱ्या गारमेंटसाठी सर्वच व्यवसायिकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लगाते. ही गरज ओळखून जिल्ह्यातील फॅशन डिझायनर, गारमेंट व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या गारमेंट क्लस्टरची स्थापना करण्यात आली आहे.

‘त्या’ दहा तरुणांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले
जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील गोकुळ मोरे या तरुणाने एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर उद्योग व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी ३ ते ४ वर्षे वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास करून अखेर त्याने गारमेंट क्षेत्रात क्लस्टरच्या रूपाने उतरण्याचा निश्चय करून गोविंद गारमेंट असोसिएशनची स्थापना केली. त्यासाठी याच क्षेत्राशी निगडीत असलेल्या १० तरुणांना एकत्र करून जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने या गारमेंट क्लस्टरची संकल्पना मांडली. त्याचे प्रयत्न व चिकाटी पाहून जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक डी.एस. गुरुलवार, उद्योग विभागाचे सहायक संचालक बी. एस. जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे आर.डी. जोंधळे, व्यवस्थापक एन. एन. मोरे, सीएमआयचे एस.एस. लोहिया यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मोरे यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या