आज हिंदुस्थान विरूद्ध इंग्लंड एकदिवसीय मुकाबला

41
फोटो सौजन्य-बी.सी.सी.आय

सामना ऑनलाईन, पुणे

महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय तसेच टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाचा इंग्लंडच्या संघाशी मुकाबला होणार आहे. पुण्याजवळच्या गहुंजे स्टेडीयमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

या आधी झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने इंग्लंडच्या संघाला ४-० ने मात दिली होती. त्यामुळे हिंदुस्थानी संघाचं मनोबल उंचावलेलं असेल. आकड्यांवर नजर टाकल्यास १९८४-८५ नंतर इंग्लंडच्या संघाला हिंदुस्थानात एकदाही मालिका विजय मिळवता आलेला नाहीये. एकूणच काय तर हिंदुस्थानी संघाचं पारडं या मालिकेमध्ये जड आहे. सराव सामन्यांमध्ये एका सामन्यात इंग्लंडच्या संघाने हिंदुस्थान ‘अ’ संघाला पराभूत केलं होतं. तर दुसरा सामना हिंदुस्थानी ‘अ’ संघाने जिंकला होता.

रोहीत शर्मा जायबंदी असल्याने लोकेश राहुल हा शिखर धवनसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. युवराज सिंग या सामन्यातून पुनरागमन करतोय. युवराज,अजिंक्य रहाणे आणि धोनी यांच्यामुळे हिंदुस्थानी संघाची मदळी फळी अत्यंत मजबूत झाली आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह सोबतच उमेश यादव हे वेगवान गोलंदाज संघात असण्याची शक्यता आहे. तर फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन और रवींद्र जडेजा यांचं संघातील स्थान नक्की आहे.

इयान मॉर्गनच्या संघसमावेशामुळे इंग्लंडच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. जेसन रॉय आणि अॅलेक्स हेल्स हे सलामीला येतील. मधल्या फळीमध्ये इग्लंडकडे जो रूट,इयान मोर्गन, जॉन बेअरस्टो आणि मोईन अली अशी तगडी नावं आहे. कागदावर तरी इंग्लंडचा संघ ताकदवान दिसतोय. मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हिंदुस्थानी संघासमोर प्रत्यक्षात तो किती यशस्वी होतो हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या