डिसेंबरमध्ये गगनयानची पहिली चाचणी, जी-1 रॉकेटचे हार्डवेअर श्रीहरिकोटा येथे पोहोचले

हिंदुस्थानी संशोधन अंतराळ संस्था अर्थात इस्रो या वर्षीच्या अखेरमध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यात आपल्या मानवमुक्त अंतराळ मोहिमेची पहिली चाचणी उड्डाण करणार आहे. ही चाचणी करताना कोणत्याही मनुष्याला पाठवले जाणार नाही. या मोहिमेच्या दुसऱ्या फ्लाइटमध्ये व्योम मित्र रोबोट तर तिसऱ्या फ्लाइटमध्ये चार अंतराळवीर पाठवले जाणार आहेत. परंतु, इस्रोने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या उड्डाणाची तारीख जाहीर केली नाही.

गगनयानची मानवयुक्त मोहीम तीन दिवसांसाठी असणार आहे. ज्याअंतर्गत अंतराळवीरांची एक टीम पृथ्वीच्या 400 किमीवरच्या कक्षेत पाठवली जाईल. यानंतर, क्रू मॉड्यूल (ज्यामध्ये अंतराळवीर बसतात) समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर हिंदुस्थान या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा हिंदुस्थान चौथा देश ठरेल. याआधी अशी कामगिरी अमेरिका, चीन आणि रशियाने केलेली आहे.

10 हजार कोटी रुपयांचा खर्च

इस्रोच्या गगनयानाच्या तीन दिवसांच्या मोहिमेसाठी 10 हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. ही हिंदुस्थानची पहिली स्वदेशी मोहीम आहे. ज्यात अंतराळवीर अवकाशात जातील. 12 एप्रिल 1961 ला रशिया, 5 मे 1961 ला अमेरिका तर 15 ऑक्टोबर 2003 ला चीनने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल

मिशनच्या रॉकेटचे हार्डवेअर श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये पोहोचले आहे. त्याचवेळी, त्रिवेंद्रममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये क्रू मॉड्यूलवर काम सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.