खानावळीच्या रेकॉर्डचा चुराडा करत बाहुबलीची विक्रमी कमाईकडे वाटचाल सुरूच

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

‘बाहुबली-२’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच अनेक विक्रम नावावर केले होते. प्रदर्शनानंतरही चित्रपटाचे कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आमीर, शाहरुख, सलमान या खानावळीच्या चित्रपटांनी केलेल्या विक्रमाचा चुराडा करत बाहुबलीने एक हजार कोटीच्या कमाईकडे वाटचाल सुरूच ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाने जगभरात एकूण ८६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

जगभरात ९ हजार स्क्रिनवर झळकलेल्या बाहुबली-२ चित्रपट सहा भाषांत प्रदर्शित करण्यात आला आहे. हिंदुस्थानमध्ये हिंदी भाषेतील बाहुबली-२ ने २४७ कोटींची कमाई केली आहे. तर इतर सर्व भाषांमध्ये मिळून या चित्रपटाने हिंदुस्थानात ५३४ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एका फटक्यात आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘पीके’ चित्रपटाचा विक्रम मोडलेत.

याआधी जगभरात सर्वाधिक कमाईच्या बाबतीत अमिरचा ‘पीके’ हा हिंदुस्थानी चित्रपट आघाडीवर होता. ‘पीके’ची एकूण जागतिक कमाई ७९२ कोटी होती. प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या राजामौली दिग्दर्शित चित्रपटाने हा विक्रम मोडला आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी ‘बाहुबली-२’ चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या