दूषित पाण्याने पंचगंगेतील हजारो माशांचा मृत्यू

39

सामना प्रतिनिधी । शिरोळ

शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत रयायनमिश्रीत दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. नदीचे पाणी काळेकुट्ट झाले असून त्याला उग्र वास येत आहे. या पाण्याचा नमुना घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत डांबून ठेवले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी कामत व कडले यांना नदीतील दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या सोबत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी पोलीस व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी दूषित पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले.

पंचगंगा नदीत कोल्हापूर महापालिकेच्या जयंती नाल्यातून प्रत्येक दिवशी १२० दशलक्ष लिटर तर इचलकरंजी नगरपालिकेचा काळा नाला व औद्योगिक वसाहतीतून प्रोसेसचे ५६ दशलक्ष लिटर सांडपाणी मिसळते, असा आरोप स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. हे सांडपाणी सोडण्यात येणाऱ्या केंद्राचे वीज कनेक्शन तात्काळ बंद करावे आणि ठोस उपाय केल्याशिवाय अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. तसेच येत्या दोन दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केल्यास या प्रदूषित पाण्यातील मृत मासे अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवून आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या