रस्त्यावर माशांचा खच, लोकांना हकलवून पोलिसांनीही भरल्या थैल्या

743

जी ललचाये रहा न जाए रहा न जाए… ही जाहिरातील मधील टॅग लाईन मंगळवारी अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवली. उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील अर्मापूर ठाणा विभागात मंगळवारी सकाळी एक अपघात झाला. स्पीड ब्रेकरवरून जाणारा ट्रक अनियंत्रित झाला आणि हजारो माशांनी भरलेल्या ट्रकची पिशवी फाटली. यामुळे रस्त्यावर सर्वत्र माशांचा खच पडला. हे मासे गोळा करण्यासाठी एकच गर्दी झाली. रस्त्यावर गर्दी झाल्याची माहिती मिळताच जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी लाठी उगारत जमलेल्या गर्दीला पांगवले, पण गर्दी बाजूला सरताच काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही मासे घरी घेऊन जाण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी जवळच प्लॅस्टिकच्या थैल्या शोधून भरभरून मासे नेल्याचे वृत्त समोर आले आहे.

एका हिंदी वृत्तसंकेत स्थळाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. कानपूर शहरातील अर्मापूर भागातील गन फॅक्टरी रोडवरून माशांनी भरलेला एक ट्रक चालला होता. यावेळी स्पीड ब्रेकरवरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकमधील पिशवी फाटली. रस्त्यावर माशांचा खच पडला. ताजे मासे पाहून आजूबाजूच्या वाटसरूंनी गर्दी केली आणि थैल्याभरून मासे घरी नेले. या गर्दीमुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेर पोलिसांना ही खबर मिळाली आणि गर्दी पांगवण्यासाठी ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लाठीच्या जोरावर गर्दी पांगवली. मात्र ताजे मासे पाहून त्यांनी देखील आपल्या थैल्या भरण्यास सुरुवात केली. सकाळी 7 वाजता घटना घडली आणि पुढील चार तास मासे उचलण्याचे काम सुरू होते, इतकी मासळी त्या ट्रकमध्ये होती.

आपली प्रतिक्रिया द्या