क्रॉफर्ड मार्केटजवळील मासळी बाजार ऐरोलीला हलविण्याचा घाट, मच्छीविक्रेत्यांचा संताप

25


सामना प्रतिनिधी । मुंबई

इमारत जीर्ण झाल्याचे सांगत क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधील मासळी विक्रेत्यांना ऐरोलीला हलवण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. मात्र तसे केल्यास वर्षानुवर्षे या ठिकाणी सुरू असलेला आमचा व्यवसाय बुडणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे मच्छीविक्रेते सांगत आहेत. त्यामुळे पालिकेने जवळच्या परिसरात स्थलांतर करावे अन्यथा जोरदार आंदोलनाचा इशाराही मच्छीविक्रेत्यांनी दिला आहे.

मासळी विक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका येथे जाण्याची नोटीस पाठवली आहे, मात्र ऐरोलीला गेल्यास मासे घेणारे गिर्‍हाईक तुटेल व उपासमारीची केळ येईल, असे मच्छीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित मच्छीमारांच्या मागण्यांसंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय गटनेते पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी दिली.

निर्णय न बदलल्यास जोरदार आंदोलन, नोटीसमधील शब्दप्रयोगांमुळे संभ्रम

मागील अनेक वर्षांपासून कोळी महिला घाऊक मच्छीकिक्रेत्यांकडून ससून गोदी, कसारा गोदी तसेच भाऊचा धक्का येथून मासळी विकत घेत आहेत.  ही मासळी किरकोळ पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज मंडईत किक्री केली जाते. मुंबईतील वैयक्तिक ग्राहकांपासून छोटी-मोठी हॉटेल आणि कंपन्यांतील ग्राहक हे मच्छीविक्रेत्यांचे ग्राहक आहेत. पालिकेच्या बाजार विभागाकडून विक्रेत्यांना आलेली नोटीस संभ्रम निर्माण करणारी आहे. नोटिसीमध्ये ‘तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत’ असे नमूद करून ऐरोली नाका येथे ‘कायमस्वरूपी जागा मिळण्यासापेक्ष स्थलांतरित’ असा शब्दप्रयोग केला आहे.

तर दहा लाख लोकांचा उदरनिर्वाह बुडेल

गेल्या 40 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट कसलेले आहे. इथे दररोज मोठय़ा प्रमाणात माशांची खरेदी-किक्री होते. सुमारे दहा लाख लोक या मासे व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र 1 ऑगस्टपासून हे मार्केट ऐरोलीला स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या मच्छीविक्रेत्यांना दिली असल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल आणि मच्छी व्यवसायासंबंधित लोकांचा उदरनिर्वाह बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या