उलटीसाठी 25 कोटींची बोली, म्यानमारच्या मच्छिमाराचे भाग्य उजळलं

उलटी विकून एखाद्या व्यक्तीचं भाग्य उजळल्याची घटना आजपर्यंत ऐकिवात नाहीये. मात्र ही घटना प्रत्यक्षात घडली असून थायलंडचा एक मच्छिमार करोडपती होणार आहे. महिन्याला 500 पाऊंडची कमाई करणाऱ्या या मच्छिमाराला आता 24 लाख पाऊंड किंवा त्याहूनही अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

नारीस सुनावसांग या मच्छिमाराच्या हाती एक दगड लागला होता. विचित्र वाटणारा हा दगड कसला आहे याची माहिती घेतल्यानंतर त्याला कळालं की तो देवमाशाने केलेल्या उलटीपासून बनलेला दगड आहे. (Whale Vomit, Ambergris) समुद्रात मिळणारं सोनं म्हणून या उलटीचं वर्णन केलं जातं. या उलटीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो जो अल्कोहोलविरहीत असल्याने त्याचा वापर सुगंधी द्रव्यांचा गंध दीर्घकाळ टीकवण्यासाठी केला जातो. नारीसला हा दगड समुद्राच्या तळाशी मिळाला होता. तो त्याने घरी नेल्यावर त्याबाबतची माहिती जमा केली आणि त्यातून त्याला कळालं की हा दगड म्हणजे देवमाशाची उलटी आहे.

हा दगड इतका किंमती का असतो ?

देवमाशामध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव पाझरत असतो. काही जणांचा दावा आहे की या स्त्रावाचा वापर करून देवमासा त्याचं अन्न विरघळवतो. देवमाशाच्या विष्ठेमध्ये या स्त्रावाचा अंश असतो असाही काहींचा दावा आहे. सुगंधी द्रव्याचा गंध अधिक काळ टीकवण्यासाठी देवमाशाच्या उलटीतून मिळवलेल्या स्त्रावाचा वापर केला जातो. सुनावसांग याला दगड मिळाल्यानंतर त्याचा छोटा भाग जाळण्यात आला, जाळल्यानंतर त्यातून आलेल्या विशिष्ट गंधामुळे तो दगड म्हणजे देवमाशाच्या उलटीचाच दगड असल्याची खात्री पटली.

100 किलो वजन

सुवानसांग याच्या हाती 100 किलो वजनाचा दगड लागला आहे. आतापर्यंत सापडलेला हा अशा प्रकारचा सगळ्यात मोठा दगड असल्याचं सांगण्यात येतंय. या दगडासाठी बोली लावण्यात येत असून एका व्यापाऱ्याने प्रत्येक किलोमागे सुनावसांग याला 23,740 पाऊंड देण्याचं कबूल केलं आहे. हा दगड देवमाशाची उलटीच असल्याची अधिकृतरित्या खात्री पटवण्यासाठी सुनावसांग सरकारी अधिकाऱ्यांची वाट पाहतोय. तोपर्यंत या दगडाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सुवानसांग याने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या