कोळीवाडय़ांचा पर्यटनदृष्टय़ा विकास होणार

मुंबई शहर जिह्याच्या सन 2023-24  या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 450 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत या वर्षीच्या आराखडय़ात 135  कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, अमीन पटेल, तमिल सेलवन, अॅड. मनीषा कायंदे उपस्थित होते. या निधीतून मुंबईच्या वैभवात अधिक भर घालून त्याला नवीन झळाळी दिली जाणार आहे. रुग्णालयांमध्ये अधिक सुविधा, कोळीवाडय़ांचा पर्यटनदृष्टय़ा विकास, पोलीस वसाहतींची दुरुस्ती, कामगार कल्याण पेंद्राच्या मैदानाला आधुनिक स्वरूप देण्यावर भर देण्यात येईल. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारून शहरात रोजगार निर्मिती वाढविण्यात येईल. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतील फॅशन स्ट्रीट, भेंडीबाजार, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याची योजना आहे.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत 2023-24  साठीच्या वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 19.28 कोटी तर आदिवासी उपयोजनेच्या 14 लाख रुपयांच्या प्रारूप आराखडय़ास मंजुरी देण्यात आली, तर सन 2021-22 च्या तरतुदीमधील 99.91 टक्के रक्कम खर्च करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिवडी किल्ल्याच्या देखभालीसाठी समिती

शिवडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी समिती तयार करण्यात यावी, अशी सूचना मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामे हटविण्यात यावीत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यात याव्यात. केम्पस कॉर्नरजवळील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.