मासेमारीचा बंदी 1 जूनपासून; मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्याची हर्णे बंदरात लगभग

पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 1 जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे हर्णे बंदरात मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्याची मासेमारांची लगभग सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये यावर्षी 1 जून 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जून ते 31 जुलै या दरम्यानच्या कालावधीत मासळीच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रीयेस वाव मिळून मासळीच्या साठयाचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते.

शासनाने निर्धारित केलेला 1 जून हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी नजिक आल्याने हर्णे बंदरातील मासेमारांनी आपल्या मच्छिमारी नौका किनाऱ्यावर आणण्याची लगभग सुरू केली आहे. त्यामुळे पुढील दोन चार दिवसात बहुतांश नौका या किनाऱ्यावर विसवणार आहेत. मागील वर्षी वातावरणातील बिघाडामुळे 15 मे पासूनच नौका शाकारणी सुरू झाली होती. मात्र, यावर्षी समुद्र अद्याप शांत आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत बहुतांश नौका आपला मासळी हंगाम पूर्ण करणार आहेत. त्यामुळे पर्यटक आणि बहुसंख्येने आलेल्या चाकरमानी वर्गाला ताज्या मासळीवर ताव मारणे शक्य होणार आहे.

हर्णे बंदरात लहान मोठया साधारणपणे एक हजारच्या आसपास नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत. हर्णे बंदर हे मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्हयातील दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर असले तरी अजूनही हर्णे बंदरात जेटीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे हर्णे बंदरातील बोटींना आपल्या विसाव्यासाठी हर्णे बंदरापासूनच नजिक असलेल्या आंजर्ले अडखळ खाडीत तसेच दाभोळ बंदरात मासेमारी बोटींना घेवून जावे लागते. आंजर्ले खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ अदयापही काढलेला नसल्याने अडखळ खाडीत बोटी नेताना मच्छिमारांची मोठीच दमछाक होते.

समुद्रातील बदलते वातावरण, कधी कधी वादळसदृष्य निर्माण होणारी परिस्थिती, त्यातच मलपी फास्टर बोटी आणि एलइडी लाईटव्दारे करण्यात येणा-या मासेमारीमुळे हर्णे बंदरात पारंपारीक मासेमारी करणारे आधीच आर्थिक अडचणी आलेे आहेत. त्यात आता दोन महिण्याचा मासेमारी बंदीचा काळ त्यामुळे मासेमारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासळीच्या जीवाना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे बीजनिर्मिती प्रक्रीयेस वाव मिळून मासळीच्या साठयाचे जतन होते. तसेच या दरम्यानच्या कालावधीतील हवामान हे समुद्रात जाणे धोक्याचे असते. शासनाने धोक्याचा काळ निर्धारीत केला असल्याने मासेमारांची जीवीत हानी अथवा वित हानी झाल्यास शासन नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळे कुठल्याही यांत्रिक नौकांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये.बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– दिप्ती साळवी, परवाना अधिकारी, दाभोळ