मासेमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या; 1 जूनपासून मासेमारी बंदी

मासेमारी हंगाम संपत असल्यामुळे यापुर्वीच मच्छिमारांनी त्यांच्या नौका किनाऱ्यावर आणल्या आहेत. 1 जून ते 31 जुलै या दरम्यान मासेमारी बंदीचा काळ आहे. मासेमारी बंदीचा काळ सुरु झाल्याने सुमारे साडेतीन हजार नौकांनी किनाऱ्यावर विसावा घेतला आहे.

यंदाचा मासेमारी हंगाम बुधवारी संपला. यंदाच्या हंगामात मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा, कोळंबी, सुरमई, पापलेट आणि अन्य प्रकारचे मासेही सापडले. यंदाचा हंगाम मच्छिमारांसाठी समाधानकारक गेला. 1 जूनपासून यांत्रिकी पध्दतीच्या मासेमारीवर बंदीचा काळ सुरु होत आहे. बंदीचा काळ जवळ आल्यामुळे गेल्या आठवड्यापासूनच आपल्या नौका मच्छिमारांनी किनाऱ्यावर आणायला सुरुवात केली. सुमारे साडेतीन हजार नौका किनाऱ्यावर विसावणार आहेत.

1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. 1 ऑगस्टपासून पारंपारिक मासेमारी सुरू होईल तर पर्ससीन नेट मासेमारीला 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा काळ देण्यात आला आहे. दरम्यान बंदी काळात मासेमारी करताना नौका आढळल्यास त्यांच्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय कायदेशीर कारवाई करणार आहे. यासाठी दोन महिने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय किनाऱ्यावर देखरेख ठेवणार आहे.