देवगड बंदरात नांगरून ठेवलेली नौका पलटली

समुद्रात 7 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ताशी 55 ते 75 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तसेच जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात, मुंबईसह शेकडो मासेमारी नौका सुरक्षिततेच्यादृष्टीने देवगड बंदरात दाखल झाल्या असतानाच मालवण तालुक्यातील आचरा या गावातील नौका सुरक्षेच्या दृष्टिकोनाने देवगड बंदरात उभी केली असताना एका बाजूने पलटी होऊन नौकामध्ये पाणी गेल्याने नौकेचे नुकसान झाले आहे. नेमकी नौका कशामुळे पलटी झाली आहे याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली.

मालवण तालुक्यातील आचरा या गावी गावातील मच्छिमार व्यवसायिकांनी मच्छीमार हंगाम बंद होण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने नौका देवगड बंदरात शाकारून ठेवण्यात आली होती, परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्रात तसेच खाडीत अनेक बदल त्यातच मुसळधार पावसामुळे काची एक बाजू पूर्णता पाण्यामध्ये बुडाल्याने नौकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसून नौका बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत अन्यथा नौकेचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य स्थितीमुळे देवगड बंदरात गुजरात येथील 56 नौका, मुंबई येथील 5 नौका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मासेमारी नौका सुरक्षिततेसाठी दाखल झाल्या आहेत. देवगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत, मात्र तालुक्यात कुठेही पडझड झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागात झाली नव्हती. देवगड तालुक्यात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात 175 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तविली असल्याने किनाऱ्यावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.