फिट आणि तंदुरुस्त

आजचे तरुण कामाच्या अतिव्यस्त जीवनशैलीमुळे कंटाळा, थकलेले चेहरे, निरुत्साह अशा तक्रारी करतात. कामाच्या ताणामुळे तरुणाईमध्ये शारीरिक बदलही झपाटय़ाने होतात. स्वास्थ्य चांगले असेल तर कोणत्याही कामामध्ये उत्साह हा कायम राहतो. याकरिता सध्या तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्याधी, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय पाहू.

शारीरिक ताण आणि अशक्तपणा
अधिक काम, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूडचे सेवन, अपूर्ण झोप, सकाळी न्याहारी न करणे, मद्यपान यामुळे तरुणांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण वाढत आहे. पोषकतत्त्वे कमी म्हणजे न्यूट्रीशनल स्टार्वेशन.
उपाय
दिवसभरात भरपूर पाणी पिणे. कमीतकमी तीन लिटर पाणी प्यावे. तळलेले, रस्त्यावर मिळणारे किंवा फास्टफूड खाणे टाळावे. त्याऐवजी फळे आणि फळांचा ज्युस मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा यांचे सेवन करणे.

मायग्रेन
अभ्यासाच्या, करियरच्या किंवा ऑफिसमधील कामाच्या तणावामुळे तरुणांमध्ये मायग्रेन म्हणजेच अर्धशिशि या विकाराचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर न जेवणे, फास्टफूडचे अतिसेवन करणे, हार्मोन्समध्ये बदल, ठराविक अन्नपदार्थांचेच सेवन या सवयींमुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळेही मायग्रेन होऊ शकतो.
उपाय
आहार वेळेवर घेणे. आहारात ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या, बाजरी, मासे यांचा समावेश करणे. ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा.

मधुमेह, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, ह्रदयविकार
तिशीत- चाळीसीत सहज कोणालाही होताना दिसणारे हे आजार आजकाल सामान्य झाले आहेत. बदलते राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती, व्यायामाचा अभाव या मुळे हे घडत आहे.
उपाय
रोज किमान ४५मिनिट चालणे, व्यायाम करणे फार उपयुक्त ठरते. तसेच पोषकयुक्त सकस आहार, फास्टफूड टाळणे, मद्यपान, धूम्रपान टाळावे आरोग्यासाठी मदतीचे ठरेल. ध्यानधारणा करावी. रोज ६-७ तास झोप घ्यावी.

सोशल मीडियाचे व्यसन
तरुणांमध्ये समाजमाध्यमांचा वापर करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र याचा सकारात्मक दृष्टिकोण जसा आहे तसा नकारात्मक आहे. सतत फेसबुक, वॉट्सऍप, इंन्स्टाग्राम, ट्विटर यांचा वापर हानी पोहचवीत असतोल. सोशल मीडिया स्लो पॉयझन आहे. त्यामुळे कामातील, अभ्यासातील एकाग्रता कमी होते.
उपाय
कमीतकमी वेळ सोशल मीडियावर घालवावा. रात्रीच्या वेळी शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा. त्यापेक्षा मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्यावर भर द्या. पुस्तकवाचन करा.