पुणेकर व्हा! पुणेकर व्हा!

43

मेधा पालकर, [email protected]

एका सर्वेक्षणानुसार पुणेकर फिटनेससाठी सर्वाधिक वेळ देतात… पाहूया त्यांच्या फिटनेसचे गुपित…

पुणे तिथे काय उणे’ असं म्हणतात ते काही खोटं नाही. खवय्ये, चोखंदळ अशी बिरुदावली पुणेकरांना लावली जात असली तरी,  हेच खवय्ये पुणेकर फिटनेस आणि निरोगी आयुष्य जगण्यात मागे नाहीत. उलट त्यांनी फिटनेसच्याबाबतीत देशात बाजी मारली आहे.  मॉर्निंग वॉक, त्यानंतर सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, ऍरोबिक्स, झुम्बा, किक बॉक्सिंग, योगा, प्राणायाम, अशा विविध व्यायाम प्रकारांमध्ये सातत्य राखण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. खरं तर निरोगी आयुष्यासाठी फिटनेस खूप महत्वाचा आहे, याचे महत्त्व पुणेकरांना समजले आहे. त्यामुळेच पुणेकर मंडळी फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक आहेत, असे नुकतेच झालेल्या फिटनेस ब्रॅण्ड रिबॉक यांनी केलेल्या फिट इंडिया सर्वेक्षणातून समोर आले आहे.

फिट इंडिया सर्वेक्षणातून असे लक्षात येते की, ६० टक्के हिंदुस्थानी लोक आठकडय़ातून किमान ४ तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचे  समोर आलं आहे. फिटनेसच्या बाबतीत पुणे आणि चंदीगड हे देशात पुढे आहेत. सर्व शहरांमध्ये पुण्याचा फिटनेस स्कोअर सर्वाधिक म्हणजे ७.६५ टक्के एवढा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे देशभरात पुणेकर फिटनेससाठी सर्वात जास्त वेळ देतात. एवढंच नाही तर, एकापेक्षा जास्त फिजिकल ऑक्टिक्हिटी करतात. चंदीगडचा फिटनेस स्कोअर ७.३५ टक्के आहे. चंदीगडमधील तरुणांचा निरोगी लाइफस्टाइलकडे फार ओढा आहे. येथील लोकं फिटनेससाठी फक्त रनिंगच करत नाही तर योगा देखील न चुकता करतात. दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरे याबाबतीत बरीच मागे आहेत. त्यांचा फिटनेस स्कोअरही फारच कमी आहे. या फिटनेस टेस्टमध्ये २० ते ३५ वर्षांच्या १५०० महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठय़ा शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. सर्क्हेमध्ये  सहभागी झालेले ८० टक्के लोक निरोगी लाइफस्टाइलसाठी आग्रही होते.

एकंदरीतच जीवनशैलीत बदल झाल्याने व्यायामाकडे कल वाढलेला दिसतो आहे. बाहेरचे खाणे खूप वाढले. त्यामुळे वजन वाढल्याचे दिसून येते. हे वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक वाटू लागला. पण व्यायामामध्ये सातत्य दिसत नाही. अलिकडे आरोग्याचे प्रश्न मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने उच्चमध्यवर्गीय, मध्यमवर्गीय व्यक्तींमध्ये व्यायामाच्या बाबतीत जागरूकता निर्माण होताना दिसते आहे. वजन कमी करण्याकडे विशेष कल दिसतो आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, संधिवात, मणक्यांचे आजार यासारखे आजार असतील तर, वैद्यकीय तपासण्या करूनच व्यायामतज्ञ व्यायाम आणि आहार ठरवून देतात. बऱयाचदा वयाच्या चाळीशीनंतर आरोग्य सांभाळले नाही तर, आजार जडण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी व्यायामतज्ञांमार्फत जीमच्या माध्यमातून तर काही ठिकाणी योगा क्लासमध्ये जावून व्यायाम करून स्वतः ला फिट ठेवण्याबाबत माणसे जागरूक झाली आहेत. दवाखान्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा जीम, व्यायाम क्लासमध्ये सातत्य ठेवणे याला प्राधान्य देताना लोक दिसत आहेत.

व्यायामतज्ञ संजय कोंडे म्हणाले, इथले वातावरण आरोग्याच्या दृष्टीने खूप आल्हाददायक आहे. शिवाय ऋतूमानानुसार व्यायामाचे प्रकार ठरवून दिले जातात. त्या त्या ऋतूमध्ये ते व्यायाम केले की त्याचे शरीर तंदुरुस्तीसाठी मिळणारे फायदे आहेत. उदाहरणार्थ उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी  आहे. उष्ण वातावरणामुळे शरीराला घाम येतो. ‘कॅलरी बर्न’ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे व्यायाम करताना थकवा जास्त जाणवतो. तर पावसाळा आणि हिवाळयामध्ये वातावरण थंड असल्याने घाम कमी येतो. त्यामुळे थकवा जाणवत नाही. अलिकडे माणसाची जीवनशैली बदलली आहे. या बदलत्या जीवनशैलीला सामोरे जाण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. व्यायामामध्ये पुणेकर जागरुक असल्याचे नेहमीच जाणवते. काही जण ठरवून दिलेला आहारच घेतात. सातत्य असेल तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसतो. पुणेकरांच्या बाबतीत आपण हेच म्हणू शकतो. १५ ते ९० वयोगटातील व्यक्ती व्यायामास प्राधान्य देतात. पुण्यात अद्ययावत व्यायामशाळा, उत्तम आहारतज्ञ, जीम प्रशिक्षक आहेत. शिवाय उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रक,साहित्य, टेकडय़ा, तलाव अशा गोष्टी असल्याने त्याचा सर्रास वापर सर्वसामान्य माणसालाही करता येतो. तोही विना मोबदला.

 

आपली प्रतिक्रिया द्या