चॉकलेट हीरोचा फिटनेस!

1052

>> वरद चव्हाण

आशुतोष कुलकर्णी. मराठीतला चॉकलेट हीरो. 30%व्यायाम आणि 70%योग्य आहार या नियमाने त्याने स्वतःला लवचिक आणि फिट ठेवले आहे.

आपल्या मराठी सिनेसृष्टीत गोरे गोमटे, नाकीडोळी नीटस, उंचपुरे आणि फिट असणारे हिरोज तसे कमीच, पण आजचा आपला लेख एका अशा कलाकाराचा आहे, ज्याला वरील सगळी विशेषणे अगदी फिट बसतात. आजचा आपला फिट सेलिब्रिटी म्हणजेच आशुतोष कुलकर्णी. आशुने नुसतीच हीरोची नव्हे तर स्वतःच्या हीरो इमेजला आव्हान देऊन व्हिलनची भूमिकासुद्धा स्वीकारली आहे. गेली कित्येक वर्षे आशूने स्वतःला मेन्टेन ठेवलंय. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या फिटनेसचे रहस्य काय आहे? त्याला व्यायामाची आवड आहे का? तो कुठले डाएट फॉलो करतो का ते? आशूचे बाबा एक प्रोफेशनल रेसलर आणि बॉक्सर होते. आता ते निवृत्त झाले, पण त्यांची शिस्त आणि ट्रेनिंग सेशन्स बघून आशूलासुद्धा व्यायामाची आवड लागली.

पुण्यातल्याच एका व्यायामशाळेत तो जाऊ लागला आणि फिट राहण्यासाठी योग्य तो व्यायाम शिकू लागला. अभिनयाचं तर वेड होतंच. त्यामुळे व्यायाम हा नुसताच आपली आवड म्हणून नाही तर आपल्या प्रोफेशनची गरज म्हणून करायला लागला. वेगवेगळय़ा मालिकेतून तो अनेकांची मन जिंकत होता आणि व्यायामसुद्धा नियमितपणे चालू होता, पण त्याचं करीअर अगदी उंचीवर असतानाच त्याला एका आजाराला सामोर जावं लागलं. याच आजारामुळे त्याला काही काळासाठी स्वतःची कामे थांबवावी लागली आणि त्याचा व्यायामसुद्धा बंद झाला, पण आशूने हार कधीच मानली नाही. या कठीण काळातसुद्धा तो मानसिकदृष्टय़ा खूप सकारात्मक राहायचा आणि आजारातून उठल्या उठल्या त्याने पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली. आता अर्थातच आधीसारखा व्यायाम करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्याने प्राथमिक योगाचे प्रकार म्हणजेच प्राणायाम इत्यादी करायला सुरुवात केली. त्यांनी जिम लावायचे ठरवलंच पण लोखंडाशी खेळ खेळण्यापेक्षा त्यांनी कार्डिओ आणि ऍब्स वर्कआऊटवर जास्त भर दिला.

आता आधीसारखा व्यायाम करणं शक्य नाही म्हटल्यावर त्याने त्याच्या फॅमिली डॉक्टरच्या मदतीने स्वतःच एक डाएट प्लॅन आखला. आशू शुद्ध शाकाहारी आहे. त्याने स्वतःला सर्व व्यसनांपासून (दारू, सिगारेट) दूर ठेवलंय. आशूचे आई-बाबा पुण्यात राहतात. शूटच्या वेळेस आशू स्वतःच भाज्या विकत घ्यायला जातो. भाजी किंवा धान्य विकत घेताना प्रोटीन आणि कार्ब्सचे प्रमाण डोक्यात ठेवूनच भाज्या विकत घेतो. शूटचे जेवण शक्यतो जेवत नाही. स्वतःचे डबे शूटवर नेतो. साधारणपणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आशूचे सहा मिल्स होतात. सकाळी उठल्यावर एक कप कोमट पाणी आणि ऍलोवेरा ज्यूस. वरील दोन्ही गोष्टी रिकाम्या पोटी घेणे गरजेचे आहे. मग पोटभर नाश्ता. नाश्ता व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नाश्त्यात काहीही खा पण पोटभर खा या मताचा तो आहे. शूटला लंच ब्रेक साधारण 2 पर्यंत होतो आणि सकाळचा नाश्ता 7.30 ला झालेला असतो. साहजिक आहे मधल्या वेळेत भूक लागतेच. मग तेव्हा सॅलड खाणं पसंत करतो. एकावेळी एक तर भात किंवा पोळी खाणं तो पसंत करतो. दोन्ही एकत्र कधीच करत नाही. भातातसुद्धा ब्राऊन राईसला तो जास्त प्राधान्य देतो. शूटदरम्यान लंच आणि डिनरमध्ये संध्याकाळी प्रत्येकाला चहाबरोबरच काही ना काही खाण्याची हुक्की येतेच. तेव्हा उकडलेले मूग, कॉर्न, चणे, मखाणे खाणे पसंत करतो. रात्रीचं जेवण शक्यतो 8 च्या आधी करणं गरजेचं आहे.

कधी कधी शूट मध्यरात्रीपर्यंतसुद्धा चालतं. मग समजा जेवणानंतर भूक लागलीच तर एक कप दूध आणि सुका मेव्यावर स्वतःची भूक तो भागवतो. आपण स्वतःच्या जिभेसाठी न खाता पोटासाठी खावं या ठाम विचाराचा तो आहे. आशूबरोबर मी ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत काम केलंय. आम्ही एकत्र बरेच ऍक्शन सिक्वेन्स केले आहेत. ऍक्शन फाईटस्मधले आशूचं ज्ञान आणि त्यांची फ्लेक्सिबिलिटी उत्तम आहे. समोरच्याला इजा न पोचवता सीन किती उत्तम दिसेल यावर त्याचं जास्त लक्ष असतं. तो एवढे टेक्निकली परफेक्ट होण्यामागचं कारण म्हणजे त्याने लहानपणीच शितोरियो कराटेचे ट्रेनिंग घेतले आहे. काय मग फिटनेस फ्रिक्स, पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक असं उदाहरण घेऊन आलोय की फिट राहण्यासाठी तुम्ही 2-3 तास जिममध्ये जाऊन व्यायाम करणे गरजेचं नसतं. स्वतःचा आहार जरी तुम्ही नियंत्रणात ठेवलात तरी तुम्ही दीर्घ काळासाठी फिट राहू शकता. अर्थात लेख वाचून किंवा इंटरनेटवरून स्वतः आहार ठरवू नका. सर्टिफाईड आहारतज्ञांकडूनच सल्ला घ्या आणि हो पावसाळा सुरू झालाय तब्येतीची काळजी घ्या आणि मासे खाणाऱयांनो पावसाळय़ात मासे खाणं चांगलं नसतं लक्षात ठेवा. या हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या