जालन्यात रेल्वे रुळाच्या सेफ्टी फिश प्लेट चोरणारे पाचजण जेरबंद; सुदैवाने दुर्घटना टळली

दोन रेल्वे रुळाला एकमेकांसोबत जोडून ठेवण्यासाठी ज्या सेफ्टी फिश प्लेट बसविण्यात येतात. जालन्यात त्या प्लेटच चोरट्यांनी काढून नेल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. या प्रकरणी जालन्यातील पाच चोरट्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जालना रेल्वे स्थानक ते दरेगाव दरम्यान रेल्वे रुळाला जोडण्यासाठी सेफ्टी फिश प्लेट चोरी होत असल्याने याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला होता.

या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे गाड्यांची गती कमी करावी लागत होती. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी रेल्वे रुळाच्या सेफ्टी फिश प्लेटा चोरणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात एमआयडीसीतील काही कंपन्यांचाही समावेश असल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तविली असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन माहिन्यांपासून जालना परिसरातील रेल्वे रुळाच्या सेफ्टी फिश प्लेट चोरणाऱ्या आरोपींना जालना येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रेल्वे विभागाचे तब्बल अडीच टन लोखंड जप्त केले आहे. मागील दोन महिन्यांपासून जालना ते बदनापूर रेल्वे स्थानकादरम्यान दोन रेल्वे रुळाला जोडणाऱ्या सेफ्टी फिश प्लेट चोरी करीत असल्याची तक्रार रेल्वे अभियंता मनोज कुमार निराला यांनी रेल्वे सुरक्षा बल जालना यांच्याकडे दिली होती.

यावरून रेल्वे सुरक्षा बल जालना यांनी गुन्ह्याची नोंद करून सहा मंडल सूरक्षा आयुक्त नांदेड सी. पी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नाराम, उपनिरीक्षक संदीप कुमार, सहायक उपनिरीक्षक विजय वाघ, हेड कॉ्स्टेबल शेळके, हेड कॉन्स्टेबल नलावडे, हेड कॉन्स्टेबल डोभाल कॉन्स्टेबल जयपाल यांची या तपासकामी नेमणूक केली होती. या पथकाने सापळा रचून 3 ऑगस्ट रोजी आरोपी सलमान सय्यद हसन (रा. रामनगर, जालना), शेख नदीम शेख नसीर (रा. चंदनझिरा जालना), सलीमखान रशीद खान (रा. सुंदर नगर जालना), शेख सुफियान शेख सिराज (रा. चंदनझिरा जालना) या चार आरोपीना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते रेल्वेचा माल चोरी करून नासेर सांडू शेख(रा. सुंदर नगर जालना) यास विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांना त्याच्या गोडाऊनमध्ये 20 फिश प्लेट, 24 नटबोल्ट, एक लिव्हर पोलिसांनी जप्त केला. तसेच ड्रायपोर्टचा चोरी गेलेला ट्रेकचा 23 कुनटल माल मिळाला. रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी पाचही आरोपींना संभाजीनगर येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. त्यांची रवानगी हर्सूल जेलमध्ये केली होती. जालना रेल्वे पोलिसांनी 5 ऑगस्ट रोजी पुन्हा वरील सर्व आरोपींना चौकशीसाठी जालन्यात आणले. कलम 3(अ) रेल्वे संपत्ती विधी विरूध्द कब्जा अधिनियम-1966 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेफ्टी प्लेट चोरीस गेल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र आरोपी पकडले गेल्याने पुढचा अनर्थ टळला असंही पोलीस म्हणाले. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप कुमार, सहा. उपनिरीक्षक विजय वाघ व त्यांची टीम करीत आहे.