धक्कादायक ! वसईतील मतदान केंद्रात शाईमुळे कर्मचाऱ्यांची बोटे सुजली

31

सामना ऑनलाईन । वसई

मतदान केल्याची खूण लक्षात यावी म्हणून डाव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाते. मात्र हीच शाई निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलीच त्रासदायक ठरल्याचा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. या शाईच्या ऍलर्जीमुळे पाच कर्मचाऱ्यांची बोटे सुजली असून त्यांना प्रचंड वेदना झाल्या. या धक्कादायक प्रकाराने भेदरलेल्या या कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली.

मतदान करणाऱ्या मतदारांच्या डाव्या बोटाला काळ्या रंगाची शाई लावण्यात येते. मतदान केंद्रातील एका कर्मचाऱ्याची या कामासाठी नियुक्ती करण्यात येते. मात्र या शाईची बाधा वसईतील काही कर्मचाऱ्यांना झाली. वसईच्या नाझरेथ शाळेतील मतदान केंद्रात काम करणाऱ्या दीपाली बागूल या महिला कर्मचाऱ्याच्या बोटाला शाई लागली. काही वेळाने तिच्या हाताच्या बोटांना वेदना जाणवू लागल्या. त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र नंतर वेदना वाढू लागल्या. परंतु मतदान केंद्र सोडता येत नव्हते. मतदान प्रक्रिया संपल्यावर त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे धाव घेतली. काळ्या शाईची ऍलर्जी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन आणि औषधे दिली. अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन चार ते पाच रुग्ण आल्याची माहिती त्या डॉक्टरांनी दिली.

गुणवत्ता तपासणे गरजेचे
शाई ज्या बाटतील होती ती छोटी आणि निमुळती होती. त्यामुळे त्यातून शाई काढून लावताना हाताला लागत होती. तिथे टिपकागदाची सोय नव्हती, असे दीपाली बागूल यांनी सांगितले. शाई निघू नये म्हणून ती अधिक तीव्र रसायनांनी बनवली जाते. मात्र त्याचा थेट हाताशी संपर्क येत असल्याने या शाईची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या