‘त्या’ व्यापाऱ्याची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस, श्रीरामपुरातील पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीची घोषणा

श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी बंधूंनी माळवाडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची देणी बुडवून पोबारा केला असून, त्याबाबत अद्यापि कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळे संतप्त पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीतील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्याच्या परिवारातील फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माळवाडगाव येथील ‘त्या’ व्यापारी कुटुंबाने बायका मुलांसह महिन्याभरापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पळ काढला होता.

माळवाडगावसह पंचक्रोशीतील गावातील हजारो शेतकऱ्यांचे 25 कोटी, बँका, पतसंस्था, भिशीचालक, सोयाबीन मील, किराणा, भुसार व्यापारी अशांचे एकूण 40 कोटी रुपयांना चुना लावला आहे. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर, जालना, मालेगाव, मुंबई, ठाणे, टिटवाळा येथे जाऊन तपास केला. या तपासात काहीही ठोस धागेदोरे हाताला लागले नाहीत.

मात्र, त्याची दुचाकी टिटवाळा येथे मेहुण्याकडे आढळून आली. त्यामुळे त्यास पथकाने तपासकामी ताब्यात घेऊन बरोबर आणले होते. या परिवाराने पळून जाण्याच्या दिवशी या मेहुण्याची लोणी, संगमनेरपर्यंत मदत घेतली; परंतु आम्ही पळून चाललो असल्याची त्याला कल्पना येऊ न देता दुचाकी माझ्या ताब्यात देऊन कारमधून मलाही चकवा दिला. त्यानंतर कोणत्या शहराकडे पोबारा केला, हे सांगता येत नाही, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. या परिवाराचे सर्व मोबाईल स्वीच ऑफ असले तरी एक मोबाईल काही दिवस सुरू असल्याचे निदर्शनास आले. एक महिन्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत. आज तब्बल एक महिना पूर्ण झाल्याने पोलीस पथकास मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांसह पीडित शेतकऱ्यांनी बैठक घेऊन यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेऊन पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने त्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या