भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली. मयतांमध्ये चार विद्यार्थ्यांसह चालकाचा समावेश आहे. दिल्ली-लखनऊ महामार्गावर सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की कारमध्ये मृतदेह अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कारचे दरवाजे आणि छत कापावे लागले.
आयुषी पटेल, गरिमा त्रिपाठी, प्रतीक सिंह, सतीश आणि विजय साहू अशी मयतांची नावे आहेत. आयुषी पटेल, गरिमा त्रिपाठी, प्रतीक सिंह, सतीश हे बीटेकचे विद्यार्थी आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर 15 किमीपर्यंत महामार्गावर चक्काजाम झाला होता.
दिल्ली-लखनऊ महामार्गावर भरधाव ट्रकने कारला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर कार पुढे उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यात कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील बीटेकचे दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनीसह चालकाचा जागीच मृत्यू झाला.