अवसरी खुर्द वन विभागात पाच आरोपींनी घोरपड या वन्यप्राण्याची शिकार करून खाल्ल्या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे, त्यांना घोडेगाव कोर्टासमोर सादर केले असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
मंचर वनपरिक्षेत्रातील अवसरी खुर्द, तांबडे मळा येथील असणाऱ्या अवसरी घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड असल्यामुळे झाडी निर्माण झालेली आहे या ठिकाणी मोर, ससे, लांडगे, कोल्हे, तरस, बिबट व अन्य काही वन्यजीव आढळून येत असतात. काही लोक मोराची शिकार करण्यासाठी आले असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाल्यानंतर या माहितीची खात्री करण्यासाठी वनविभागाने तात्काळ हालचाल सुरू केली. यादरम्यान जुन्नर वनविभागातील मंचर वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ मंचर, नियतक्षेत्र अवसरी खुर्द मध्ये दिनांक 10जून रोजी तांबडेमळा येथे अवसरी घाटामध्ये काही लोक मोराची शिकार करत असल्याची माहिती मिळाल्या नंतर राखीव वनामध्ये सीताराम महादू पारधी (वय- 55, कहु , ता खेड, नवनाथ बाळू ठाकर , (वय- 27 वर्ष, रा.आळंदी ता- खेड, गणेश बाळ ठाकर( वय- 22 वर्ष, रा. आळंदी,ता-खेड), सोमनाथ सीताराम पारधी, (वय- 28 वर्ष, गाव – कहु, ता खेड), दिपक सीताराम पारधी (वय- 24 वर्ष, गाव – कहू , ता खेड) यांना संशयत म्हणून ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर ते घोरपड पकडण्यासाठी आले होते, असे निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान त्यांनी पेठ येथील राहत्या घरी घोरपड या शेड्युल 1 प्राण्याची शिकार करून घरामध्ये शिजवून खाल्ली. तिथून कोयता,गोफण, घोरपडीचे शिजवलेले मटण ताब्यात घेतले व त्यांचेवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करून प्रथम प्रतिवृत्त व.प्रा.10/24-25 दि 10 रोजी अन्वये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता शैलेश राजहंस , वनपाल मंचर संभाजी गायकवाड, वनपाल कळंब शशिकांत मडके, वनरक्षक महाळुंगे पड़वळ रईस मोमीन, इतर सर्व वनपरिक्षेत्र मंचर अंतर्गतक्षेत्रीय तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी एन.आर.प्रविण,मुख्य वनसंरक्षक, पुणे (भा.व.से) अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर,संदेश पाटील सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, यांच्यामार्गदर्शनाखाली कार्यवाही यशस्वी केली आहे. पुढील तपास स्मिता शैलेश राजहंस,वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर व त्यांचे कर्मचारी करीत आहे.
जुन्नर वनविभागा मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तस्करी अतिक्रमण,अवैध वृक्षतोड करणे कायद्याने गुन्हा आहे. संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाचा टोल फ्रीनंबर 1926 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊन सहकार्य करण्यात यावे असे आवाहन राजहंस यांनी केले आहे.