आर्थिक वादातून व्यावसायिकाचे गर्दीच्या ठिकाणाहून अपहरण; पाच जणांची टोळी जेरबंद

आर्थिक वादातून एका व्यावसायिकाचे सायंकाळच्या वेळेस भर गर्दीच्या ठिकाणाहून अपहरण करणाऱ्या कुप्रसिद्ध वाळू माफियासह त्याच्या टोळीला गजाआड करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-12ला यश आले आहे.एका आरोपीच्या देहबोलीवरून तपास चक्र फिरवून पथकाने अपहरणकर्त्यांच्या दोन दिवसात मुसक्या आवळल्या.

सोमवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास पीडित व्यावसायिक दिंडोशी बस डेपोसमोर त्यांच्या मर्सीडीज कारने आले. ते कारमधून बाहेर येताच चार ते पाच जणांनी त्यांना जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवून नेले. हा प्रकार पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने तत्काळ हा प्रकार पोलिसांना सांगितला. भर गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारे अपहरणाचा गुन्हा घडल्याने उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट-12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक सचिन गवस, एपीआय विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, उपनिरीक्षक हेमंत गिते तसेच संतोष बने व पथकाने तत्काळ गुह्याचा तपास सुरू केला.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपहरणकर्त्यांमधील एका आरोपीची देहबोली रेकॉर्डवरील आरोपीसारखी वाटल्याने सखोल तपास करण्यात आला. त्या आरोपीची गुप्त माहिती काढली असता तो रेकॉर्डवरचा असून तो गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मग पथकाने तांत्रिक बाबी व खबऱ्यांच्या मदतीने शोधमोहिम सुरू केल्यावर आरोपी व्यावसायिकाला घेऊन नाशिकला गेल्याचे समोर आले. तसेच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा शिर्डी येथील रेकॉर्डवरचा गुन्हेगार व वाळू माफिया असल्याचे निष्पन्न झाले.

व्यावसायिक वादातून त्या गुंडाने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांची दोन पथके नाशिक आणि शिर्डीला पाठविण्यात आली. पण आरोपींनी इगतपुरी येथे व्यावसायिकाला सोडून पळ काढला होता. मात्र तरी देखील पोलिसांनी शोधमोहीम राबवून प्रदीप सरोदे (34), आरिफ शेख (30), सुर्यकांत जाधव (30), सुरज सुर्यवंशी (29), महेश कांबळे (26) या पाच जणांना पकडून त्यांना दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या