झारखंडमध्ये पोलिसांच्या पथकावर नक्षलवादी हल्ला; 5 पोलीस शहीद

प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन । सरायकेला (झारखंड)

झारखंडमध्ये सरायकेला खरसावन जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले आहेत. त्यात 2 उपनिरीक्षक आणि 3 पोलिसांचा समावेश आहे. सायंकाळी 6.30 सुमारास हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिरुल्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुकडू येथे आठवडा बाजारादरम्यान पोलिसांचे पथक गस्तीवर होते. पथक पोहचताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीसांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच पोलीस जागीच शहीद झाले असून काही पोलीस जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. एल. मीना यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. तिरुल्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुकडू येथे आठवडा बाजारादरम्यान पोलिसांचे पथक गस्तीवर होते.पोलिस पथक या भागात शोध मोहीम राबवून परतत असताना या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी शहीद जवानांची हत्यारे घेऊन पलायन केले.