एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस

60

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘मिशन शौर्य’अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल. एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

१६ मे रोजी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनीषा धुर्वे या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. या धाडसाची दखल काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातही घेतली. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांमधील उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात मुळात काटक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना थंड प्रदेशातील एव्हरेस्टच्या मोहिमेवर सिद्ध करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणही दिले होते. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या चाचण्या करत १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या