
भरधाव कारने पाच महिलांसह दोन बालकांना धडक दिल्याची खळबळजनक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. या अपघातात एका महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिलांसह दोन बालकं जखमी झाल्याची माहिती मिळते.
‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, शोभा साईप्रसाद असे मयत महिलेचे नाव असून ती मंगलपुरी कॉलनीतील रहिवासी होती. जखमी महिला आणि बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिलांना धडक दिल्यानंतर संतप्त स्थानिकांनी कार चालकाला पकडून बेदम चोप दिला. स्थानिकांच्या मारहाणीत चालक जखमी झाला आहे. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.