अखेर पाहुणे आले! ५ महिने उशिराने फ्लेमिंगोंचे आगमन

राजकुमार भगत । न्हावाशेवा

हिवाळा सुरू झाला की दरवर्षी हजारोंच्या संख्येने उरणच्या भागात येणारे फ्लेमिंगो (रोहित) यावर्षी तब्बल ५ महिने उशिराने उरणमध्ये दाखल झाले आहेत. साधारणपणे नोहेंबर महिन्याच्या अखेरीस हे पक्षी यावेळेस मार्च महिन्याच्या सुरुवातीला येथे आले आहेत. रंगाचा सण धुम धडाक्यात साजरा होत असताना हे अग्नीपंख येथे उतरले. सध्या हजारोच्या संख्येने उरणच्या पाणजे खाडीजवळ, भारत मुंबई कंटेनर टर्मिनलजवळ या पक्षांचा डेरा आहे.

उरण जेएनपीटी परिसरात साधारणपणे दोन प्रकारचे फ्लेमिंगो येतात. रोहीत (Greater Flamingo) आणि छोटा रोहित (Lesser Flamingo) अशा इथे येणाऱ्या फ्लेमिंगोच्या जाती आहेत. खाडी किनारी व पाणथळी जागेवर हे पक्षी उतरतात. मोठ्या रोहित पक्षाचे वजन पाच किलो पर्यंत असते, त्याची उंची १२५-१४५ पंख विस्तार १४०-१६५ सेमी पर्यंत असते, याचे खाद्य नील-हरित शेवाळ, लहान मृदुकाय प्राणी हे असते. याचा प्रजनन काळ संप्टेबर-आक्टोबर किंवा फेब्रुवारी ते एप्रिल हा आहे. तर छोट्या रोहित पक्षाचे वजन १.५ ते २ किलोग्रॅम, उंची ८०-९० सेमी, पंख विस्तार ९५ ते १०० सेमी पर्यंत असतो. ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो. यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या अधिक असायची. मात्र या वर्षी आलेल्या पक्षांमध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या अधिक आहे. सध्या एक हजारच्या आसपास या पक्षांची संख्या आहे. या पक्षांमध्ये पिल्लांचे (ज्यूवेनाईल्स) प्रमाण जास्त आहे. मात्र पक्षांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी हजारोच्या संख्येने हे पक्षी येथे खाद्य खाण्यासाठी येत असत आणि संध्याकाळी मुलूंड पंपिग स्टेशन जवळ वस्तीसाठी जात असत. यावर्षी मात्र या पक्षांनी येथेच खाडी किनारी आपला डेरा टाकला आहे. जेएनपीटीचे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनलच्या बाजूलाच असलेल्या पाणजे खाडीमध्ये हे पक्षी वास्तव्य करून आहेत.

सैबेरीया, रशिया, युरोप तसेच भारताच्या गुजरात-राज्यस्थान मधिल रण-कच्छमधून हे पक्षी येथे येतात. थंडी सुरू झाली की साधारणपणे नोहेंबर महिन्या पासून हे पक्षी येथे यायला सुरुवात होते. हजारोच्या संख्येने हे पक्षी येथे थांबायचे. फ्लेमिंगो व्यतिरिक्त शॉवेलर डक, हॅरिअर, लॉकेस, नॉब्रबँन, रॅडिश सेल डक, मार्श हॅरिअर, पेंटेड स्टार्क, स्मूनबील, सँड पायपर सह देशी पाण कोंबडे,करकोचे, बगळे, पाणकावळे मोठ्या प्रमाणात येतात. हिवाळा संपला की मार्च महिन्यामध्ये हे पक्षा येथून स्थलांतर करत असतात. मात्र यावर्षी या पक्षांना येथे येण्यासाठी मार्च महिना उजाडावा लागला. त्यामुळे या वर्षी या पक्षांचा येथिल मुक्काम आणखी वाढणार आहे.

प्लेमिंगोना आवश्यक असणारे खाद्य या ठिकाणी पुरेश्या प्रमाणात मिळत असल्याने ते उरणच्या भागात येतात. यावर्षी त्यांचा प्रजनन काळ लांबल्याने त्यांना येण्यासाठी उशिर झाला आहे. येथे सध्या आलेल्या पक्षांमध्ये लेसर फ्लेमिंगो (छोटा रोहीत) पक्षांची संख्या जास्त आहे. त्यांच्या सोबत त्यांची पिल्ले (ज्यूवेनाईल्स) आहेत. मात्र ही पिल्ले उडण्यास समर्थ होई पर्यंत त्यांना थांबावे लागले त्यामुळे त्यांना येथे यण्यास उशिर झाला असण्याची शक्यता आहे, असे पक्षीप्रेमी निकेतन ठाकूर यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या