कारागृहातून पळालेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरी विशेष कारागृहातील अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळालेला रुपेश कुंभारला आज स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी शाखेने पेढे येथे सापळा रचून पकडले. गुहागर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.05/रुपेश तुकाराम कुंभार (वय 39 रा.वेळंब कुंभारवाडा ता.गुहागर जि.रत्नागिरी ) हा यापूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी शिक्षा भोगत होता. त्यानंतर तो दिनांक 27 ऑक्टोबर 2018 रोजी पासून रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये उर्वरीत शिक्षा भोगणेकरीता दाखल झालेला होता. जिल्हा विशेष कारागृह रत्नागिरी या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा भोगत रुपेश कुंभार हा 11 जून रोजी रत्नागिरी जिल्हा विशेष (खुले) कारागृहातून पळून गेलेला होता.

रूपेश कुंभारच्या शोधाकरीता पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांचे मार्गदर्शनाखाली एक खास पथक तयार करून रूपेश कुंभारचा शोध सुरु केला. या पथकाने आरोपीत याचे नातेवाईक, यापुर्वी जेलमधून जामिनावर- शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपी यांचेकडे चौकशी करून बातमीदार तयार करण्यात आलेले होते. तसेच आरोपीत तो पळून जाणेपुर्वी त्याला कारागृहात भेटाण्याकरिता आलेले नातेवाईक व मित्र यांची कारागृह प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती घेऊन त्यांच्याशी समन्वय ठेवण्यात आला.

या पथकाने तयार केलेल्या बातमीदार यांच्याकडून नमूद आरोपी हा चिपळुण तालुक्यातील पर्शुराम लोटे, पेढे, धामणदेवी या परिसरात असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे शोध पथकाने या परिसरातील गावे व जंगलमय भागात फिरून 3 दिवस शोध घेतला. आज मंगळवारी रुपेश तुकाराम कुंभार हा पेढे या ठिकाणी असल्याबाबत माहीती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सपोफौ सुभाष माने, पोहेकॉ संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, मिलींद कदम, आशिष शेलार, विजय आंबेकर, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.