काही दिवसांपासून सातत्याने विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच आज गुरुवारीही जर्मनीच्या फ्रँकफर्टहून मुंबईला येणाऱ्या विस्ताराच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर विमानाचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ लँडिंग करण्यात आले. त्यानंतर विमानातील सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र, संशयास्पद काहीच आढळले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विस्ताराच्या विमानाचे गुरुवारी सकाळी 7.45 वाजता सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, विमानामध्ये 134 प्रवासी आणि 13 क्रू सदस्य प्रवास करत होते. विस्ताराने एका निवेदनात म्हटले आहे की, फ्रॅंकफर्ट – मुंबईच्या विमानाला सुरक्षा अॅलर्ट मिळाला. त्यामुळे विमानाचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ लँडिंग करण्यात आले.
याआधी बुधवारी दिल्लीहून बंगळुरुला जाणाऱ्या अकासा विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली होती. अकासा विमान QP 1335 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून-बंगळुरूला जात होते. यावेळी विमानात 174 प्रवासी होते. 3 लहान बालकं आणि 7 क्रू सदस्य होते. त्यांना सुरक्षा अलर्ट मिळालाय. अकासा विमानाची इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गांभीर्य पाहता पायलटला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वळविण्यास सांगितले.